Railway Employee News : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे कारण की रेल्वे मंत्रालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ब्रिटिश कालीन गणवेशात अखेर आता मोदी सरकारने बदल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खऱ्या अर्थाने आज भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा आणि प्रतीकात्मक बदल जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे ही देशातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे.

आता याच रेल्वे मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ब्रिटिशकालीन गणवेशात बदल होणार आहे. खरंतर मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये विविध शहरांची मुघल कालीन नावे बदलण्यात आली आहेत. तसेच रेल्वे स्थानकांची नावे सुद्धा मोदी सरकारने चेंज केली आहेत.
त्याचप्रमाणे आता ब्रिटिशांची गुलामगिरीची आठवण सखोल पुसून टाकण्याच्या हेतूने मोदी सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी शुक्रवारी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
एका कार्यक्रमात मंत्री महोदयांनी ही मोठी घोषणा केली. बदलत्या काळानुसार जुन्या आणि गुलामी मानसिकतेशी संबंधित गोष्टी मागे टाकल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले. रेल्वे मंत्री म्हणाले की, “आपण केवळ पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान किंवा सेवा यांपुरतेच बदल मर्यादित ठेवू नये, तर आपल्या विचारसरणीतूनही गुलामीची मानसिकता दूर केली पाहिजे.
आपली काम करण्याची पद्धत असो किंवा आपली वेशभूषा, सर्व ठिकाणी स्वदेशी विचार आणि आधुनिकतेचा स्वीकार झाला पाहिजे.” याच भूमिकेतून रेल्वेमध्ये दीर्घकाळापासून वापरात असलेला ब्रिटिशांनी आणलेला बंद गळ्याचा काळा कोट आता औपचारिक पोशाख राहणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
हा निर्णय केवळ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गणवेशापुरता मर्यादित नसून, देशातील इतर संस्थांमधील ब्रिटिशकालीन परंपरांवरही पुनर्विचार केला जाणार आहे. विशेषतः विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर समारंभात वापरले जाणारे गाऊन आणि टोप्या, तसेच विविध औपचारिक कार्यक्रमांमध्ये अधिकाऱ्यांनी घालावे लागणारे बंद गळ्याचे कोट यामध्ये बदल करण्याचा विचार सुरू असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सूचित केले.
या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या गणवेशाला अस्वस्थ आणि हवामानास प्रतिकूल असल्याचे यापूर्वीही सांगितले होते.
नव्या गणवेशामुळे काम करताना अधिक सोयीस्कर, भारतीय संस्कृतीशी सुसंगत आणि आधुनिक असा बदल अपेक्षित आहे. एकूणच, भारतीय रेल्वे केवळ तांत्रिकदृष्ट्या आधुनिक होत नाही, तर मानसिकतेत आणि ओळखीतही नवा बदल घडवत आहे.
गुलामीच्या खुणा पुसून स्वाभिमान, स्वदेशीपणा आणि आधुनिक भारताची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने हा निर्णय एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.













