Maharashtra Government Employee News : सरकारी नोकरी असावी असे अनेकांचे स्वप्न असते. कारण म्हणजे सरकारी नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध लाभ पुरवले जातात.
सरकारी कर्मचाऱ्यांना पगारा व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींचा लाभ मिळतो. त्यांना पगारा व्यतिरिक्त वेगवेगळे भत्ते दिले जातात. यामुळे अनेकांना सरकारी नोकरी आवडते, अनेकजण या नोकरीकडे आकर्षित होतात.

दरम्यान राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील वय वर्ष 40 च्या पुढील सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पाच हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे.
काही कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा तर काही कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा भत्ता मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत एक जीआर काढण्यात आला होता.
दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला. या निर्णयानुसार वय वर्षे 40 व त्यापेक्षा अधिक असलेल्या राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुपये 5,000/- इतका वैद्यकीय प्रतिपूर्ती भत्ता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या शासन निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपणे आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढणारे आजार, तणाव, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
सदर शासन निर्णयानुसार प्रतिपूर्ती भत्ता वयानुसार दोन गटांत विभागण्यात आला आहे. पहिला गट म्हणजे 40 ते 50 वर्षे वयोगटातील राज्य अधिकारी व कर्मचारी. या वयोगटातील कर्मचाऱ्यांना दर दोन वर्षांतून एक वेळेस वैद्यकीय तपासणीसाठी रुपये 5,000/- इतकी वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कम अदा करण्याचे निर्देश आहेत.
दुसरा गट म्हणजे वय वर्षे 51 व त्यापेक्षा अधिक असलेले राज्य अधिकारी व कर्मचारी. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणीसाठी रुपये 5,000/- इतका वैद्यकीय प्रतिपूर्ती भत्ता देण्याचे स्पष्ट निर्देश शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत.
या शासन निर्णयातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी घेतलेला एक दिवसाचा कालावधी हा कर्मचाऱ्यांचा कर्तव्यकाल (ड्युटी) म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना रजा घेण्याची आवश्यकता भासणार नाही, ही बाब कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक आहे. सदर शासन निर्णयामध्ये वैद्यकीय तपासणी करताना कोणकोणत्या तपासण्या कराव्यात, त्याचा तपशील देखील स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.
त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी या शासन निर्णयाचा लाभ घ्यावा, वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. हा निर्णय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, कर्मचारी वर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.













