Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू झाली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची सुरुवात केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. याचा लाभ 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जात असून या अंतर्गत महिलांना वार्षिक 18000 रुपये मिळतात.

अलीकडेच या योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे वितरित करण्यात आलेत. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना मकर संक्रांतीच्या आधी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे मिळणार अशी माहिती सरकारमधील मंत्र्यांकडून समोर आली आहे. राज्यात 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
लाडकी बहीण पुन्हा राजकीय वादात
दुसरीकडे, राज्यात आचारसंहिता लागू असतानाही महायुती सरकार मधील मंत्र्यांकडून लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीच्या दिवशी मिळतील असा दावा केला जाऊ लागला.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शहर केली ज्यामध्ये त्यांनी लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आधी दोन महिन्यांचे हप्ते मिळणार अशी माहिती दिली. दरम्यान शासनाच्या या तयारीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आणि आचारसंहिता सुरू असताना देखील सरकार अशी घोषणा कशी करू शकते असा प्रश्न उपस्थित करत राज्य निवडणूक आयोगाला याबाबत पत्र सुद्धा सादर केले.
आता राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या पत्राची दखल घेत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे संकेत दिले आहेत यामुळे लाडके बहीण योजनेला संक्रांतीच्या आधी डिसेंबर आणि जानेवारी या दोन हप्त्यांचे पैसे मिळणार नसल्याचे चित्र तयार होत आहे.
काँग्रेसने आचारसंहितेच्या काळात अशा स्वरूपाचा निधी वितरित करणे म्हणजे महिला मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत लाडकी बहिणी योजनेचे हप्ते आचारसंहिता काळात वितरित करण्यावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने आयोगाकडे यासंदर्भात पत्र सुद्धा पाठवले आहे.
त्यामुळे या हप्त्याच्या वितरणाला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून आता शासन आचारसंहिता सुरू असतानाही लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करणार का हे पाहण्यासारखें राहणार आहे.
तीस लाख महिला अपात्र
दरम्यान मध्यंतरी या योजनेचा अनेक अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचे समोर आल्यानंतर शासनाने या योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली. यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आणि या मुदतीत अनेकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र 30 लाख महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. म्हणून सदर अपात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे केवायसी न केलेल्या अशा महिला लाभार्थी आता या योजनेतून बाद केल्या जाणार आहेत.













