Maharashtra : विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी एक कामाची बातमी आहे. राज्यातील बहुतांश शाळांना येत्या आठवड्यात सलग सुट्टी मिळणार असा अंदाज आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रात होणारे मतदान.
या मतदान प्रक्रियेसाठी अनेक ठिकाणी शाळांमध्येच मतदान केंद्रे उभारण्यात येत असल्याने मतदानाच्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी रोजी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येते. मात्र आता मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजीही शाळांना सुट्टी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी पुढे आली आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. मतदानाची अधिकृत वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत असली तरी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहते.
मतदानानंतर ईव्हीएम सील करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, साहित्य संकलन केंद्रावर जमा करणे आणि अहवाल सादर करणे या सर्व प्रक्रिया अनेक तास चालतात. त्यामुळे उशिरा घरी पोहोचून दुसऱ्याच दिवशी पुन्हा शाळेत नियमित कामावर हजर राहणे शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या अत्यंत ताणदायक ठरते.
याच पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी निवडणुकीत काम करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी विशेष सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. आता डॉक्टर सूर्यवंशी यांच्या मागणीला यश आले तर शाळा सलग बंद राहणार आहेत.
या दिवशी विद्यार्थ्यांना आराम
14 बुधवार – मकर संक्रांत
15 गुरवार – महापालिका मतदान
16 शुक्रवार – आरामासाठी सुट्टीची मागणी
17 शनिवार – Half Day
18 रविवार – आठवडी सुट्टी













