शिर्डी, दि.२१ : प्रतिनिधी
दुष्काळमुक्त महाराष्ट्राची संकल्प पूर्ण करताना गोदावरी धरण समूहात अधिकचे पाणी निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आल्याने पुणतांबा व परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोठी मदत होईल.

पुणतांबा येथील जुन्या के.टी. वेअरचे आधुनिक ‘व्हर्टिकल बॅरेज’मध्ये रूपांतर करण्यासही विभागाने मान्यता दिल्याने वीस टक्के पाणी साठ्यात वाढ होईल.या कामास निधीची उपलब्धता करून देण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी पुणतांबा परिसरात ७६ एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, यामुळे पुणतांबा, नपावाडी, रामपूरवाडी व पिंपळवाडी या गावांतील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्नही निकाली निघणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
पुणतांबा येथे सुमारे ९कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, उप विभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, दत्तू धोजे, डॉ. धनंजयराव धनवटे आदी उपस्थित होते. यावेळी ‘राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक कृषी अवजारांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
जलसंपदा विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना श्री.विखे पाटील म्हणाले , गोदावरी कालव्याच्या १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच नूतनीकरण व सक्षमी करणासाठी ४०० कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वितरिका क्रमांक १८ आणि १९ च्या माध्यमातून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोकणातून वाया जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नगर जिल्ह्यासह संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी ९० हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे.
यातून ८५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यातील ५५ टीएमसी जायकवाडी, १५ ते २० टीएमसी भंडारदरा व १५ टीएमसी पाणी मुळा धरणात सोडण्याचे नियोजन असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
शिर्डी औद्यगिक वसाहती मध्ये संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे ‘हब’ विकसित होत आहे. निबे समूहासारख्या उद्योगांमुळे आणि टाटा समूहाच्या २०० कोटींच्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. हरेगाव येथे १७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून होणाऱ्या ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ प्रकल्पामुळे १० हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
शिर्डी विमानतळ विस्तारीकरणासाठी ७०० कोटींचा निधी देण्यात आला असून, एमआरओ सेंटरच्या माध्यमातून ५ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
श्री.विखे पाटील म्हणाले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असून स्मारकाच्या जागेचा प्रश्न प्रशासकीय स्तरावर तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सातारा जिल्ह्यातील ‘मिलिटरी अपशिंगे’ व नगरमधील घोसपुरी गावांचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात सैनिकांच्या सन्मानार्थ स्मारके उभारावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पुणतांबा येथील गावठाण विस्तार, पाणीपुरवठा योजना व घरकुलांसाठी २२ एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, विकासकामांचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे ही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.













