Gold and Silver Price : सोन आणि चांदी खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पण येत्या काळात यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची राहील.
खरंतर या मौल्यवान धातूच्या गुंतवणूकदारांना मागील काही महिन्यांमध्ये छप्परफाड असा परतावा मिळाला आहे. 2025 मध्ये सोने आणि चांदी गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे राहिले आहे. शेअर मार्केट पेक्षा या मूल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मागील वर्षी अधिक रिटर्न मिळालाय.

पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवे उच्चांक गाठणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींना मोठा ब्रेक लागला आहे. भू-राजकीय तणाव कमी होण्याची चिन्हे, अमेरिकन डॉलरमध्ये आलेली मजबुती आणि नफावसुलीमुळे सोन्याच्या दरात गुरुवारी लक्षणीय घसरण नोंदवली गेली.
विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्यानंतर बाजारातील वातावरण बदलले आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत नाटोसोबत भविष्यातील कराराची एक चौकट निश्चित झाल्याचे सांगितले.
तसेच युरोपीय देशांवर टॅरिफ लावण्याची दिलेली धमकीही त्यांनी मागे घेतली. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव कमी होण्याची अपेक्षा निर्माण झाली असून गुंतवणूकदारांचा कल जोखीम असलेल्या मालमत्तांकडे वाढला आहे. परिणामी, सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी कमी झाली आहे.
या घडामोडींचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून आला. स्पॉट गोल्डचे दर सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे 1 टक्क्यांनी घसरले, तर अमेरिकन फ्युचर्स बाजारात फेब्रुवारी सोन्याचा वायदा देखील जवळपास 1 टक्क्यांनी खाली आला. डॉलर मजबूत झाल्यामुळे इतर चलनांमध्ये व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोने महाग झाले आणि त्यामुळे खरेदीचा उत्साह कमी झाला.
देशांतर्गत बाजारातही या घसरणीचे प्रतिबिंब दिसले. MCX वर सोन्याचा फेब्रुवारी वायदा काहीसा दबावात राहिला आणि 10 ग्रॅममागे सुमारे 1,52,879 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. मात्र, चांदीच्या बाबतीत चित्र थोडे वेगळे दिसले. औद्योगिक मागणी आणि स्पॉट मार्केटमधील खरेदीमुळे MCX वर मार्च चांदीचा वायदा सुमारे 0.90 टक्क्यांनी वाढून 3,21,343 रुपये प्रति किलोवर पोहोचला.
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या विधानानंतर निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे बाजारातील भीती कमी झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतून नफा काढून शेअर्स आणि इतर जोखीम असलेल्या पर्यायांकडे वळत आहेत. पुढील काळात जागतिक राजकीय घडामोडी, डॉलरची दिशा आणि महागाईविषयक आकडे यावर सोन्या-चांदीच्या किमतींची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.













