Dividend Stock : शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील वर्ष मार्केट साठी विशेष चिंतेचे राहिले. अनेक गुंतवणूकदारांचे गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले असून यंदाची सुरुवात पण अपेक्षेप्रमाणे झालेले नाही.
मंडळी सध्या तिमाही निकालांचा हंगाम जोरात सुरू असून गुंतवणूकदारांचे लक्ष निकालांसोबतच कॉर्पोरेट लाभाच्या घोषणांकडे पण आहे. खरंतर गेल्या काही दिवसांच्या काळात शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या अनेक कंपन्यांनी डिसेंबर तिमाहिचे निकाल जाहीर केले आहेत.

बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध कंपन्या आपले आर्थिक निकाल जाहीर करत आहेत. रेझर ब्लेड आणि ग्रूमिंग उत्पादनांची प्रमुख उत्पादक कंपनी जिलेट इंडिया (Gillette India) सुद्धा लवकरच आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. जिलेट इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याबाबत विचार करणार आहे.
गुंतवणूकदारांना केव्हा मिळणार मोठी भेट
कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, जिलेट इंडियाच्या संचालक मंडळाची बैठक २९ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या बैठकीत २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांश जाहीर करण्याबाबत विचार केला जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. कंपनीच्या २६ डिसेंबर २०२५ रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, लाभांशाबाबतचा निर्णय कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन आणि भागधारकांच्या हिताचा विचार करून घेतला जाणार आहे.
याच दिवशी म्हणजे २९ जानेवारी रोजी, जिलेट इंडिया ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल देखील जाहीर करणार आहे. त्यामुळे तिमाही निकाल आणि संभाव्य लाभांश घोषणा या दोन्ही बाबी गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. मजबूत नफा, स्थिर महसूल आणि रोख प्रवाह यावर आधारित निर्णय घेतला जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
लाभांशाच्या इतिहासाकडे पाहिले असता, जिलेट इंडिया ही गुंतवणूकदारांना नियमित आणि आकर्षक लाभांश देणारी कंपनी मानली जाते. २०२५ या वर्षात कंपनीने एकूण ११२ रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. यामध्ये १८ फेब्रुवारी २०२५ रोजी ६५ रुपयांचा अंतरिम लाभांश आणि २६ ऑगस्ट २०२५ रोजी ४७ रुपयांचा अंतिम लाभांश यांचा समावेश होता. त्यामुळे यंदाही कंपनीकडून चांगल्या लाभांशाची अपेक्षा गुंतवणूकदार करत आहेत.
दरम्यान, शेअर बाजारातील चढ-उतारांचा परिणाम जिलेट इंडियाच्या शेअर किमतीवरही दिसून येत आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर ७,९८१ रुपयांवर व्यवहार करताना दिसला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ११,५०० रुपये, तर नीचांक ७,४११.६५ रुपये असा आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर अजूनही विश्वासार्ह मानला जात असून, आगामी निकाल आणि लाभांश घोषणेकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.













