Railway News : तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का?मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरंतर रेल्वे ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि रेल्वेने प्रवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा आणि रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले नेटवर्क. यामुळे अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात.

दरम्यान अनेकांच्या माध्यमातून रेल्वे प्रवासात दारूच्या बॅटल्यासोबत नेता येतात का? असा सवाल उपस्थित केला जात होता. म्हणून आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आपल्याकडे मद्यपान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एका अहवालांनुसार, दरवर्षी एक भारतीय नागरिक सरासरी ४ ते ५ लिटर इतकं मद्यपान करतो. पण, भारतात मद्यपानाशी संबंधित कायदे अत्यंत कठोर आहेत.
मद्यपान करून वाहन चालवणे, कार्यालयात दारूच्या नशेत जाणे हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो — रेल्वेने प्रवास करताना दारूची बाटली बाळगता येते का?
मंडळी, रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. लाखो प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे सुरक्षितता, शिस्त आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय रेल्वेने काही ठोस नियम लागू केले आहेत.
भारतीय रेल्वे कायदा १९८९ मध्ये दारूवर थेट बंदी नाही, मात्र दारूबाबतचे नियम राज्यांच्या उत्पादन शुल्क कायद्यांवर अवलंबून असतात. म्हणजेच, तुम्ही ज्या राज्यातून प्रवास करत आहात त्या राज्यात मद्यपान कायदेशीर आहे की नाही, यावर सगळं अवलंबून असतं.
देशातील गुजरात, बिहार, नागालँड आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये पूर्ण किंवा अंशतः दारूबंदी लागू आहे. जर तुमची ट्रेन या राज्यांमधून जात असेल आणि तुमच्याकडे दारूची बाटली आढळली, तर तुम्हाला गंभीर कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
अशा प्रकरणांमध्ये संबंधित राज्याच्या उत्पादन शुल्क कायद्यानुसार कारवाई केली जाते, ज्यामध्ये अटक, मोठा दंड किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. जर तुम्ही दारूबंदी नसलेल्या राज्यातून प्रवास करत असाल, तर मर्यादित प्रमाणात दारू नेण्याची परवानगी असते.
साधारणपणे, प्रवासी वैयक्तिक वापरासाठी कमाल २ लिटरपर्यंत सीलबंद दारूच्या बाटल्या बाळगू शकतात. मात्र, बाटल्या पूर्णपणे सीलबंद असणे अत्यावश्यक आहे. उघडलेल्या किंवा रिकाम्या बाटल्या नेण्यास परवानगी नाही.
तसेच ट्रेनमध्ये, डब्यात किंवा प्लॅटफॉर्मवर दारू पिणे पूर्णपणे निषिद्ध आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास रेल्वे कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, ५०० ते १००० रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना दारूबाबत निष्काळजीपणा न करता संबंधित राज्यांचे नियम आधी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. थोडीशी माहिती आणि खबरदारी घेतली, तर अनावश्यक त्रास आणि कायदेशीर कारवाई टाळता येऊ शकते.













