मुंबई, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच सुरू होणार दोन नवीन रेल्वे गाड्या, कसा असणार मार्ग?

Published on -

Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचे नेटवर्क हे कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने आणि देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असल्यास रेल्वे गाडी उपलब्ध असल्याने अनेकजण या प्रवासाला प्राधान्य देतात.

पण कोरोना काळात रेल्वे प्रशासनाकडून काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यातील काही रेल्वे गाड्या पुन्हा सुरू झाल्या तर काही अजूनही रद्द आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यातून चालवल्या जाणाऱ्या काही गाड्या सुद्धा प्रशासनाने रद्द केल्या होत्या.

यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये प्रशासनाच्या विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून मुंबई आणि पुण्याकडे नियमित ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली भुसावळ–मुंबई आणि भुसावळ–पुणे या दोन स्वतंत्र रेल्वे गाड्यांची मागणी अखेर निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपल्याची चिन्हे दिसत आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आले असून, त्यावर अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

भुसावळ हे मध्य रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. दिल्ली, हावडा, नागपूर, जबलपूर आदी दिशांमधून येणाऱ्या आणि पुढे मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या बहुतेक लांब पल्ल्याच्या गाड्या भुसावळ व जळगाव स्थानकांवर थांबतात.

मात्र, या गाड्या बहुतांश वेळा आधीच पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. परिणामी, जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना आरक्षित जागा मिळणे तर दूरच, अनेकदा अनारक्षित डब्यांतही उभ्याने प्रवास करण्याची वेळ येते.

याआधी भुसावळ–मुंबई पॅसेंजर आणि भुसावळ–पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या गाड्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत होत्या. मात्र, विविध कारणांमुळे या गाड्या बंद करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली.

नोकरी, उच्च शिक्षण, व्यवसाय, तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत थेट आणि स्वतंत्र रेल्वे गाड्यांची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलन, निवेदने आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मागणी लावून धरली आहे. भुसावळ डीआरएम कार्यालयानेही प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन एप्रिल २०२४ मध्ये भुसावळ–मुंबई आणि भुसावळ–पुणे अशा दोन्ही स्वतंत्र गाड्यांचे प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाकडे पाठवले आहेत. त्यानंतर परिचालन विभागाने तांत्रिक अहवाल सादर करून या गाड्या चालविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या हे दोन्ही प्रस्ताव मुंबईतील मध्य रेल्वे मुख्यालयात अंतिम प्रक्रियेत असून, लवकरच ते रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतर संभाव्य वेळापत्रक, थांबे आणि मार्ग निश्चित केले जातील. प्रवाशांच्या दृष्टीने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात लोकप्रतिनिधींकडून ठोस पाठपुराव्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांनी पुढाकार घेतल्यास या गाड्यांना लवकर मंजुरी मिळू शकते, असा विश्वास प्रवाशांमध्ये आहे.

भुसावळहून मुंबई व पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू झाल्यास जळगाव जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष रेल्वे बोर्डाच्या अंतिम निर्णयाकडे लागून राहिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News