Gold Rate Latest Update : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारासाठी तसेच आधीच सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. सर्वसामान्य ग्राहकांना लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन खरेदी करायची असेल तर त्यांच्यासाठी देखील हे अपडेट खास ठरणार आहे.
मंडळी, सोनं आकाशाला आणि चांदी ढगाला पोहोचल्याचं आपण पाहिलंय. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सोन आणि चांदी चर्चेत आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंनी गेल्या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटन दिले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे पुढील काळातही सोने आणि चांदी तेजीतच राहणार अशा चर्चा सुरू आहेत. असे असतांना गुरुवार, २२ जानेवारी रोजी सराफा बाजारातील ग्राहकांसाठी दिलासादायक ठरला.
सुवर्णनगरीतील बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी एकाच दिवसात मोठी मान टाकली असून, अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठ्या घसरणींपैकी एक मानली जात आहे. विशेष म्हणजे लग्नसराईच्या तोंडावर दर घसरल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत होते. बुधवारी (दि. २१) तर सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती.
मात्र गुरुवारी बाजार उघडताच चित्र बदलले. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या दरातील चढ-उतार, तसेच स्थानिक मागणीतील तफावत यांचा परिणाम सराफा बाजारावर झाला. परिणामी एकाच दिवसात २४ कॅरेट सोन्याचे दर तब्बल ३,५०० रुपयांनी घसरले, तर चांदीच्या दरात विक्रमी १५,००० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी प्रतितोळा (१० ग्रॅम) २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,००० रुपये इतका होता. गुरुवारी हा दर घसरून १,५१,५०० रुपयांवर आला. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या दरात ३,५०० रुपयांची घट झाली.
त्याचप्रमाणे दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली. बुधवारी १,४१,९८० रुपये असलेला दर गुरुवारी १,३८,७७४ रुपयांपर्यंत खाली आला. यामध्ये ३,२०६ रुपयांची घसरण नोंदवली गेली.
चांदीच्या दरात तर अधिक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. २१ जानेवारी रोजी प्रतिकिलो चांदीचा दर ३,२३,००० रुपये होता. मात्र गुरुवारी हा दर थेट ३,०८,००० रुपयांवर घसरला. म्हणजेच एका दिवसात १५,००० रुपयांची मोठी घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून तीन लाखांच्या घरात असलेली चांदी अचानक खाली आल्याने बाजारात चर्चेला उधाण आले आहे.
सराफा व्यापाऱ्यांच्या मते, ही घसरण तात्पुरती असू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि पुढील काळातील मागणी यावर आगामी दर अवलंबून असतील.
मात्र सध्या तरी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा काळ अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.
दरात आलेली ही मोठी घसरण बाजाराला काहीशी स्थिरता देणारी ठरली असून, पुढील काही दिवसांत खरेदीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.













