Missing Link Project : मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून लवकरच एक महत्त्वाचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली–कुसगाव दरम्यानची बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ मार्गिका प्रकल्प महामंडळाकडून हाती घेण्यात आला असून आता हा प्रकल्प सेवेत आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे आणि लवकरच संपूर्ण मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

महाराष्ट्र दिनापासून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान ही मार्गिका सुरू झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवासाचे अंतर तब्बल ३० मिनिटांनी कमी होणार असून १ मेपासून प्रवाशांना वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
खोपोली–कुसगाव दरम्यान सुमारे १९.८० किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत हाती घेण्यात आले होते. पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून करण्यात आले आहे.
हा प्रकल्प मूळ करारानुसार २०२२ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी, अवघड भौगोलिक परिस्थिती आणि कामातील संथगतीमुळे प्रकल्पाला तब्बल चार वर्षांचा विलंब झाला.
सध्या मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज सुमारे ६५ हजार वाहने धावतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होत असून अपघातांचा धोका वाढत आहे.
भविष्यात वाढणारी वाहनसंख्या लक्षात घेऊन एमएसआरडीसीने महामार्गाचे दहापदरीकरण आणि मिसिंग लिंक उभारण्याचा निर्णय घेतला होता. या मार्गिकेमुळे घाटातील वळणावळणाचा प्रवास टळणार असून प्रवास अधिक सरळ, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.
एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, मिसिंग लिंकचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून त्यानंतर लोड टेस्ट घेतली जाणार आहे.
आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतर १ मे रोजी मार्गिकेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली आहे. काम अंतिम टप्प्यात असल्याने आता उद्घाटन लांबणीवर जाणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला ६ हजार ८५० कोटी रुपये असलेला खर्च आता ७ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
डिसेंबर २०२२पासून मार्च २०२६पर्यंत अनेक वेळा उद्घाटनाच्या तारखा जाहीर होऊनही त्या चुकल्या. अखेर आता १ मेचा नवा मुहूर्त देण्यात आला असून, प्रवाशांची बहुप्रतिक्षा लवकरच संपणार आहे.













