Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळतात म्हणजेच एका वर्षात पात्र महिलेला 18 हजार रुपयांचा मोठा आर्थिक लाभ दिला जातोय.
ही राज्यातील सर्वाधिक लाभार्थी असणारी योजना आहे. पण आता याच्या लाभासाठी महिलांना केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकून चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांच्या खात्यातील लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांच्या सोयीसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व तक्रारी, शंका आणि अडचणी सोडवण्यासाठी आता १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर विशेष मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
e-KYC दरम्यान चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झाला असल्यास, तसेच नाव, बँक खाते, आधार जोडणी किंवा हप्ता न मिळण्यासंबंधी अडचण असल्यास लाभार्थ्यांनी थेट १८१ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या हेल्पलाइनसाठी संबंधित कॉल ऑपरेटर्सना योजनेबाबत सविस्तर आणि योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना फोनवरच अचूक मार्गदर्शन मिळणार असून त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा कार्यालये किंवा सेवा केंद्रांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यापूर्वी ही मोठी अपडेट देण्यात आल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. अनेक लाभार्थ्यांना हप्ता येईल की नाही, e-KYC मुळे नाव बाद तर होणार नाही ना, अशा शंका होत्या. मात्र आता हेल्पलाइनच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
राज्य सरकारचा उद्देश कोणतीही पात्र लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये हा आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास सर्व लाभार्थ्यांनी १८१ या हेल्पलाइन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आदिती तटकरे यांनी केले आहे. ही सुविधा महिलांसाठी २४ तास उपलब्ध असून, योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.













