Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी दिलासादायक घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी किंवा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिलांचा योजनेचा लाभ थांबवण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारी आणि शंकांचे तात्काळ निरसन करण्यासाठी राज्य सरकारने १८१ महिला हेल्पलाइन क्रमांक सुरू केल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मंत्री तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास महिलांनी थेट १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.
अशा सर्व तक्रारींचे निरसन या हेल्पलाइनच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी कॉल ऑपरेटर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, महिलांना अचूक मार्गदर्शन मिळेल, याची दक्षता घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली होती.
मात्र ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही महिलांकडून अनवधानाने चुकीचा पर्याय निवडला गेल्याने त्यांचा लाभ थांबवण्यात आला. यामुळे अनेक ठिकाणी महिलांमध्ये नाराजी पसरली होती आणि काही भागांत लाडक्या बहिणींनी आंदोलनही केले होते.
या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आता लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना थांबवलेला लाभ पुन्हा देण्यात येईल, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे, अनेक महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते मिळाले नव्हते. यापैकी डिसेंबर महिन्याचा लाभ १४ जानेवारी रोजी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
राज्य सरकार महिलांच्या अडचणी गंभीरतेने घेत असून, कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सर्व लाडक्या बहिणींना १८१ हेल्पलाइनचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.













