शेतकऱ्यांना फेब्रुवारीत मोठा दिलासा! पीएम किसानसोबत नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता

Published on -

PM Kisan Yojana News : राज्यातील शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. सध्या या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, फेब्रुवारी महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेतून देखील शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.

आतापर्यंत पीएम किसान योजनेचे २१ हप्ते वितरित झाले असून, २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, हा हप्ता देखील फेब्रुवारी महिन्यातच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दोन्ही योजनांचे हप्ते साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने दिले जातात. पीएम किसान योजनेचा मागील हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार पुढील हप्ता फेब्रुवारीत मिळण्याचा अंदाज आहे.

त्याच कालावधीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचाही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रित रक्कम जमा होणार असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, राज्यात ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते.

सध्या राज्यात या योजनेचे सुमारे ९० ते ९४ लाख लाभार्थी शेतकरी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर सुमारे ८ दिवसांच्या आत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याची दाट शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe