Pune-Satara Highway : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकीचा घाट बायपास करणारा अत्यंत महत्त्वाचा नवीन बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून, जून २०२६ पासून तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे आतापर्यंत अपघातप्रवण आणि वेळखाऊ ठरणारा खंबाटकी घाटाचा प्रवास आता अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) हा प्रकल्प पुढील २५ वर्षांचा विचार करून उभारला असून, दररोज सुमारे दीड लाख वाहनांची (पीसीयू) वाहतूक हाताळण्याची त्याची क्षमता आहे.

या प्रकल्पात दोन स्वतंत्र बोगदे, सुमारे १.२ किलोमीटर लांबीचा दरीपूल (वायडक्ट) आणि स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी दोन भुयारी मार्ग (अंडरपास) यांचा समावेश आहे. एकूण ६.५ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प विविध तांत्रिक अडचणींमुळे सुमारे तीन वर्षे रखडला होता.
मात्र २०२२ नंतर कामाला गती मिळाली आणि आता तो पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. सध्या साताराहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी एक बोगदा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असून, जूनपासून दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
सध्या खंबाटकी घाटातून प्रवास करताना तीव्र चढण, अरुंद रस्ता आणि ‘एस’ वळणांमुळे ४० ते ४५ मिनिटांचा वेळ लागतो. अपघात किंवा वाहन बिघाड झाल्यास मोठी वाहतूक कोंडी होते.
मात्र नवीन बोगद्यामुळे हा प्रवास अवघ्या ७ मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, इंधनाचा वापर कमी होईल आणि वाहनांच्या टायरची झीजही घटेल.
बोगद्यात आधुनिक प्रकाश व्यवस्था, हवेसाठी शक्तिशाली पंखे, सीसीटीव्ही व पीटीझेड कॅमेरे, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळीही प्रवास सुरक्षित राहणार आहे.
बोगद्याच्या पुढील दरीपुलामुळे घाटातून जाण्याची गरज राहणार नाही, तर खंडाळा व वेळे येथे उभारलेल्या भुयारी मार्गांमुळे स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडणे सोपे होणार आहे.
खंबाटकीचा हा नवा बोगदा प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधांचे उत्तम उदाहरण ठरत असून, पुणे–सातारा महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी करण्यासाठी तो मैलाचा दगड ठरणार आहे.













