Pune News : कोकण आणि गोव्याच्या पर्यटनाचे वेड असलेल्या पुणेकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तासनतास घाटरस्ते, वाहतूक कोंडी आणि दमछाक करणारा प्रवास टाळत आता पुणेकर अवघ्या एका तासात थेट सिंधुदुर्ग आणि गोव्याला पोहोचू शकणार आहेत.
‘फ्लाय ९१’ (Fly91) या विमान कंपनीने सुरू केलेल्या नवीन प्रादेशिक विमानसेवेमुळे हा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि परवडणारा ठरणार आहे.

सध्या पुणे ते सिंधुदुर्ग हे अंतर रस्ते मार्गाने पार करण्यासाठी साधारण ८ ते ९ तासांचा वेळ लागतो. विशेषतः विकेंडला किंवा सुट्ट्यांच्या काळात हा प्रवास आणखी त्रासदायक ठरतो. मात्र, आता या नवीन विमानसेवेमुळे केवळ ६० मिनिटांत हा प्रवास पूर्ण होणार आहे.
विशेष बाब म्हणजे या हवाई प्रवासासाठी एका बाजूचे भाडे अवघ्या २,३०० रुपयांपासून सुरू होत असल्याने हा पर्याय मध्यमवर्गीय प्रवाशांसाठीही खिशाला परवडणारा आहे.
सोशल मीडियावर सिद्धांत पाटील नावाच्या युजरने या विमानसेवेची सविस्तर माहिती शेअर केल्यानंतर ही बातमी वेगाने व्हायरल होत आहे. अनेक पुणेकरांनी या सेवेमुळे पर्यटन अधिक सुलभ होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या ही विमानसेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच शनिवार आणि रविवारी उपलब्ध असणार आहे. विकेंडला कोकण किंवा गोव्याला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी हे वेळापत्रक आखण्यात आले आहे.
पुणे–सिंधुदुर्ग मार्गावर पुण्याहून सकाळी ८:०५ वाजता विमान उड्डाण करेल आणि ९:१० वाजता सिंधुदुर्ग येथे पोहोचेल. त्यानंतर सिंधुदुर्गहून पुण्याकडे सकाळी ९:३० वाजता विमान सुटून १०:३५ वाजता पुण्यात लँडिंग होईल.
तसेच पुणे–गोवा मार्गावर गोव्यातून पुण्याकडे सकाळी ६:३५ वाजता उड्डाण होऊन ७:४० वाजता आगमन होईल, तर पुण्याहून गोव्यासाठी सकाळी १०:५५ वाजता विमान सुटून १२:१० वाजता गोव्यात पोहोचेल.
कोकणातील पर्यटनाला चालना देणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचवणे, या उद्देशाने ही प्रादेशिक विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. पुणेकरांसाठी ही सेवा पर्यटनाच्या दृष्टीने गेमचेंजर ठरणार असल्याचे चित्र आहे.













