Stock To Buy : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत असली तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही कमाईची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यानच्या ट्रेडिंग आठवड्यात दलाल स्ट्रीटवर जोरदार घसरण नोंदवण्यात आली. या काळात गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला असून बाजाराची दिशा सतत बदलताना दिसली.
या आठवड्यात बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 50 हा 25,000 च्या मानसिक पातळीच्या अगदी जवळ पोहोचला, तर सेन्सेक्सनेही 81,500 चा स्तर गाठला. मात्र आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात विक्रीचा दबाव वाढला.

मध्यंतरी काही सत्रांमध्ये तेजीची झलक पाहायला मिळाली. निफ्टी 25,290 च्या वर गेला आणि सेन्सेक्सने 82,300 चा टप्पा ओलांडला, परंतु ही तेजी फार काळ टिकू शकली नाही आणि पुन्हा बाजारात घसरण झाली.
बाजारातील या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) सुरू असलेली सातत्यपूर्ण विक्री हे मुख्य कारण मानले जात आहे. याशिवाय, कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे (Q3) निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने गुंतवणूकदारांची निराशा वाढली.
विशेषतः आयटी आणि कन्झम्पशन क्षेत्रातील कंपन्यांनी कमजोर कामगिरी केली. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली विक्रमी घसरण आणि जागतिक व्यापारातील अनिश्चितता यामुळे बाजारातील भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे.
निफ्टी 50 च्या आउटलुकबाबत आनंद राठीचे उपाध्यक्ष मेहुल कोठारी यांनी सांगितले की, सध्या बाजाराची भावना नकारात्मक पण सावध आहे. निफ्टी 24,900 या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलजवळ बंद झाला आहे.
ही पातळी तुटल्यास बाजार 24,500 ते 24,400 पर्यंत घसरू शकतो. मात्र त्याखाली जाण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 25,400 ची पातळी पार न करता आल्याने बाजारातील कमजोरी समोर आली असून आता 24,800 या स्तरावरून पुनर्प्राप्ती होते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या अस्थिर परिस्थितीतही काही निवडक समभागांमध्ये संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मेहुल कोठारी यांनी आयडीबीआय बँक, IFCI आणि बँक ऑफ इंडिया या तीन समभागांवर पैज लावण्याचा सल्ला दिला आहे.
आयडीबीआय बँक 95 रुपयांना खरेदी करून 105 रुपयांचे लक्ष्य ठेवता येईल. IFCI साठी 55 रुपयांवर खरेदी आणि 65 रुपयांचे लक्ष्य सुचवण्यात आले आहे. तर बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 155 रुपयांना खरेदी करून 165 आणि 175 रुपयांची लक्ष्ये दिली आहेत.
एकूणच, बाजारात गोंधळ असला तरी योग्य रणनीती आणि संयम ठेवल्यास गुंतवणूकदारांसाठी ही काळजीपूर्वक निवड केलेल्या समभागांमधून नफा कमावण्याची संधी ठरू शकते.













