Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. मात्र, जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. जानेवारी महिना संपत आला असतानाही पैसे न मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता वाढली आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि निवडणूक प्रक्रियेमुळे हप्त्याच्या वितरणास विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीचा हप्ता देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीआधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, साधारण १० दिवसांच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, काही महिलांचे या योजनेतील लाभ अलीकडेच बंद करण्यात आले आहेत. ई-केवायसी करताना काही महिलांकडून चुकीची माहिती भरली गेल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. यामुळे अनेक महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता प्रशासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे महिलांना त्यांच्या ई-केवायसीमधील चुका दुरुस्त करण्याची एक संधी दिली जाणार आहे. कागदपत्रे योग्य आढळल्यास आणि पात्रता सिद्ध झाल्यास, अशा महिलांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
एकूणच, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्याबाबत महिलांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.













