Gold Rate Today : जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोनं आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात तणाव निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम जागतिक बुलियन बाजारावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस $5,000 च्या पुढे गेला असून चांदीनेही $100 चा टप्पा ओलांडला आहे.
या जागतिक तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही स्पष्टपणे दिसून येत आहे. Goodreturns च्या वृत्तानुसार, आज दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल २,४५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,६२,८६० रुपये झाला आहे.

तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४९,३०० रुपये इतका नोंदवला गेला. विशेष म्हणजे, १९ जानेवारी ते २५ जानेवारी या अवघ्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात १६,४८० रुपयांची मोठी वाढ झाली असून २२ कॅरेट सोन्याचे दर १५,१०० रुपयांनी वाढले आहेत.
सोन्याच्या किमतींमध्ये २०२५ या वर्षात तब्बल ६४ टक्क्यांची वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीची सातत्यपूर्ण मागणी, अमेरिकेच्या चलनविषयक धोरणातील सैलपणा, मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली खरेदी आणि ETF मधील विक्रमी गुंतवणूक यामुळे ही तेजी कायम राहिली.
२०२६ सुरू झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसांतच सोन्याच्या किमतींमध्ये १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा सोन्याकडे वळले आहे.
दरम्यान, चांदीच्या किमतींमध्येही प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. मागील वर्षी चांदीने १४७ टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतरही तेजी कायम आहे. मागील एका आठवड्यात चांदीचा दर सुमारे ४०,००० रुपयांनी वाढला असून आज दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव ५,००० रुपयांनी वाढून प्रति किलो ३,४०,००० रुपये झाला आहे.
महाराष्ट्रातील बाजारातही याच तेजीचे प्रतिबिंब दिसून येते. मुंबई, नागपूर, पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव २,५०० रुपयांनी वाढून १,६२,७१० रुपये झाला असून २२ कॅरेट सोन्याचा दर १,४९,१५० रुपये आहे.
चांदीचा दरही ५,००० रुपयांनी वाढून प्रति किलो ३,४०,००० रुपये झाला आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सोनं-चांदी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे.













