कर्जातून कर्जमुक्तीपर्यंतचा प्रवास : सुझलॉन एनर्जीची पुनरुत्थान गाथा

Published on -

Suzlon Energy : भारतातील नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सुझलॉन एनर्जीची कहाणी ही जिद्द, धाडस आणि पुनरुत्थानाचे उत्तम उदाहरण ठरली आहे. सुझलॉन एनर्जीची स्थापना उद्योजक तुलसी तांती यांनी १९९५ साली पुण्यात केली.

कापड व्यवसाय करत असताना येणारा मोठा वीजखर्च आणि सतत होणारे वीजपुरवठ्यातील व्यत्यय यामुळे पर्यायी ऊर्जेचा विचार करत तांती यांनी पवनऊर्जेकडे मोर्चा वळवला. जर्मनीतील ‘सुडविंड’ या कंपनीसोबत टर्बाइन तंत्रज्ञानासाठी भागीदारी करत त्यांनी भारतात पवनऊर्जेच्या क्षेत्रात पाऊल टाकले.

२००५ मध्ये आयपीओनंतर सुझलॉनने झपाट्याने विस्तार केला. जागतिक स्तरावर आपली उपस्थिती वाढवण्यासाठी हॅन्सेन ट्रान्समिशन आणि आरईपॉवरसारख्या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले. मात्र, या आक्रमक विस्तारामुळे कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा पडला. परिणामी, कंपनी आर्थिक अडचणीत सापडली.

२०२१ ते २०२३ या काळात कर्ज पुनर्रचनेद्वारे कर्जाचे भागभांडवलात रूपांतर करण्यात आले आणि एकूण कर्ज १३,२१० कोटींवरून १,९३८ कोटी रुपयांपर्यंत खाली आले. पुढे २०२५ मध्ये कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली.

आज सुझलॉनची भारतातील स्थापित पवनऊर्जा क्षमता १५.४ गिगावॉट इतकी असून, २० पेक्षा अधिक देशांमध्ये एकूण २०.९ गिगावॉट क्षमतेची स्थापना कंपनीने केली आहे.

आयनॉक्स विंड (४.५ गिगावॉट) आणि जीई व्हर्नोवा (३ गिगावॉट) या स्पर्धकांच्या तुलनेत सुझलॉन आघाडीवर आहे. एस-१४४ प्लॅटफॉर्म टर्बाइनला मोठी मागणी असून सध्या कंपनीचे ऑर्डर बुक ६.२ गिगावॉटचे आहे. वार्षिक उत्पादनक्षमता ४.५ गिगावॉट इतकी आहे.

आर्थिक कामगिरीच्या बाबतीतही कंपनीने भक्कम पुनरागमन केले आहे. गेल्या पाच वर्षांत विक्री आणि निव्वळ नफ्यात अनुक्रमे ३० टक्के आणि २३ टक्के चक्रवाढ वाढ झाली आहे.

२०२५ मध्ये कंपनीने १०,८९० कोटी रुपयांची विक्री आणि २,०७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. ‘आरओई’ ४१.४ टक्के आणि ‘आरओसीई’ ३२.५ टक्के इतके मजबूत आहेत. ताळेबंद आता कर्जमुक्त असून ९०३ कोटी रुपयांची रोकड आणि गुंतवणूक उपलब्ध आहे.

सध्या ६२,१५० कोटी रुपयांच्या बाजारमूल्याच्या या कंपनीचा शेअर १९.६ पीई गुणोत्तरावर उपलब्ध असून, नफावाढीच्या तुलनेत मूल्यांकन वाजवी मानले जाते. सरकारी पातळीवर नवीकरणीय ऊर्जेला मिळणारे प्राधान्य आणि कंपनीची मजबूत ऑर्डर बुक पाहता, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुझलॉन एनर्जी ही आशादायक कंपनी ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News