PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) ही देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षातून तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी २,००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
दरम्यान, आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अनेक दिवसांपासून या हप्त्याबाबत चर्चा सुरू असून, आता यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने २२वा हप्ता वितरित करण्यासाठी तयारी पूर्ण केली असून, अर्थसंकल्प सादर होण्याची वाट पाहिली जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पानंतर पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा लगेचच त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी एक महत्त्वाचे काम पूर्ण केले नसेल तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही. पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत.
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर भेट द्यावी.
त्यानंतर होमपेजवरील ‘e-KYC’ या पर्यायावर क्लिक करावे. पुढील टप्प्यात आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकावा. मोबाईलवर येणारा ओटीपी भरल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.
म्हणूनच, सर्व पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता वेळेवर आणि कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या खात्यात जमा होईल.













