8 Pay Commission : केंद्र सरकारच्या अखत्यारितील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाकडे (8th Pay Commission) आशेने पाहत आहेत. आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय झाला असला, तरी नवीन वेतनश्रेणीअंतर्गत प्रत्यक्ष पगारवाढ होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे.
सध्या या वेतन आयोगाच्या शिफारसी तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर केंद्र सरकार त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे.

दरम्यान, आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ही पगारवाढ मुख्यत्वे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल, तितकी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत आणि त्यासोबत मिळणाऱ्या महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) यांसारख्या भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे.
फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो?
आठव्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर २.० ते ३.२५ दरम्यान असण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे.
जर फिटमेंट फॅक्टर २.० निश्चित झाला, तर बेसिक सॅलरी थेट ३६,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. फिटमेंट फॅक्टर ३.० असल्यास ही सॅलरी ५४,००० रुपये होईल, तर ३.२५ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास बेसिक सॅलरी सुमारे ५८,५०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
सातव्या वेतन आयोगाचा अनुभव
सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी किमान बेसिक सॅलरी ७,००० रुपयांवरून थेट १८,००० रुपयांपर्यंत वाढली होती. याच अनुभवाच्या आधारावर यावेळीही कर्मचारी संघटनांकडून जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे.
आता सर्वांचे लक्ष समितीच्या शिफारसींवर आणि केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयावर केंद्रित झाले आहे. आठव्या वेतन आयोगामुळे नेमकी किती पगारवाढ होणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार असले तरी, कर्मचाऱ्यांसाठी ही पगारवाढ निश्चितच दिलासादायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













