Zodiac Sign : 2026 या नव्या वर्षाचा पहिला महिना आता शेवटच्या टप्प्यात आला असून, काही दिवसांत फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होणार आहे. नव्या महिन्यासोबतच खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना घडणार आहे.
पंचांगानुसार, 2026 सालातील पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात लागणार असून, या ग्रहणाचा प्रभाव अनेक राशींवर जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंचांगानुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण कंकणाकृती (Annular Solar Eclipse) स्वरूपाचे असेल.
खगोलशास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण अंटार्क्टिका, आफ्रिकेतील काही भाग तसेच दक्षिण अटलांटिक महासागराच्या परिसरात स्पष्टपणे दिसणार आहे.
भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे, सुतक काळ भारतात लागू होणार नाही, अशी माहिती पंचांग अभ्यासकांनी दिली आहे. हे ग्रहण दुपारी सुमारे 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होऊन रात्री 8 वाजेपर्यंत चालणार आहे.
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, हे सूर्यग्रहण कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात होणार आहे. त्यामुळे कुंभ राशीतील तसेच शतभिषा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर या ग्रहणाचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवू शकतो.
या काळात मानसिक अस्वस्थता, आरोग्याशी संबंधित समस्या तसेच आर्थिक निर्णयांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक किंवा महत्त्वाचे करार करताना विशेष दक्षता बाळगण्याचा सल्ला ज्योतिषांकडून दिला जात आहे.
याशिवाय सिंह, वृश्चिक, मकर आणि कुंभ या राशींनीही विशेष सावध राहण्याची गरज आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना वैवाहिक आयुष्यात गैरसमजांना सामोरे जावे लागू शकते, तर वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरातील वातावरण तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते, त्यामुळे कोणताही निर्णय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावा.
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात सूर्यदेवाची उपासना, मंत्रजप करणे शुभ मानले जाते. ग्रहणानंतर स्नान करून दानधर्म केल्यास सकारात्मक परिणाम होतो, असे सांगितले जाते. गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी, तसेच नकारात्मक विचार टाळून शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवणे हितावह ठरेल.













