Maharashtra Hawaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानात सध्या लक्षणीय बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात, विशेषतः मुंबईसह अनेक भागांत कडाक्याची थंडी जाणवत होती. मात्र आता थंडीचा कडाका हळूहळू कमी होत असून, त्याचबरोबर अनपेक्षितपणे पावसाच्या सरींनीही हजेरी लावली आहे.
वातावरणातील या सततच्या चढ-उताराचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण आणि मुंबई परिसरात सध्या ढगाळ वातावरण आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई-ठाणे परिसरात सकाळी हलक्या धुक्यासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.
मुंबईत दुपारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार वारे वाहू शकतात. दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र दुपारनंतर तापमानात वाढ होऊन उष्णतेची जाणीव होऊ शकते. येथे कमाल तापमान 29 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ हवामान राहील. काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर भागांतही ढगाळ वातावरण राहील. 27 आणि 28 जानेवारी रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांत हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
27 जानेवारीनंतर राज्यात थंडीचा जोर कमी होईल, मात्र दिवसा तापमान वाढून उष्ण हवामान जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.













