मेट्रो लाईन 8 ते समृद्धी महामार्ग विस्तार; सरकारचे 3 मोठे निर्णय, आता विकासाला नवी गती !

Published on -

Mumbai Metro Line 8 : आज (27 जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेत कामे ठरलेल्या कालावधीतच पूर्ण करा, कोणताही प्रकल्प रेंगाळू देऊ नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुंबई मेट्रो लाईन 8 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) या मार्गाला जोडणारी ही मेट्रो लाईन पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच भूसंपादनासह सर्व आवश्यक परवानग्या पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मेट्रो लाईन 8 ची एकूण लांबी 35 किलोमीटर असणार असून यामध्ये 9.25 किलोमीटर भूमिगत तर 24.636 किलोमीटर उन्नत मार्गाचा समावेश आहे. या मार्गावर एकूण 20 स्थानके असतील. त्यापैकी 6 भूमिगत आणि 14 उन्नत स्थानके असणार आहेत.

दोन स्थानकांमधील सरासरी अंतर सुमारे 1.9 किलोमीटर असेल. या प्रकल्पासाठी 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असून त्यासाठी अंदाजे 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 22 हजार 862 कोटी रुपये असणार आहे.

याच बैठकीत समृद्धी महामार्गाच्या विस्तारालाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महामार्ग गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात येणार असून त्यामुळे विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रातील दळणवळण अधिक वेगवान होणार आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गालाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. 66.15 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 3 हजार 954 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतूक सुलभ करण्यासाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूळचेरा-हेदरी-सुरजागड या 85.76 किलोमीटर लांबीच्या चार पदरी सिमेंट-काँक्रिट महामार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयांमुळे राज्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून वाहतूक अधिक सुलभ आणि किफायतशीर होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe