नवीन आधार अ‍ॅप 28 जानेवारीला लॉन्च; मोबाईल नंबर, पत्ता अपडेट घरबसल्या शक्य

Published on -

Aadhar Card Update : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून आधारधारक नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी आधार कार्डसाठीचे नवीन, लेटेस्ट आणि फुल व्हर्जन मोबाईल अ‍ॅप अधिकृतपणे लॉन्च करण्यात येणार आहे. याच दिवशी या अ‍ॅपमधील सर्व फीचर्स सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची माहिती UIDAI ने सोशल मीडियावरून दिली आहे.

या नवीन आधार अ‍ॅपमुळे आधारशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया अधिक सोप्या, जलद आणि सुरक्षित होणार आहेत. आतापर्यंत आधार कार्डवरील मोबाईल नंबर किंवा पत्ता बदलण्यासाठी नागरिकांना आधार केंद्रावर जावे लागत होते.

मात्र, फुल व्हर्जन अ‍ॅप लॉन्च झाल्यानंतर हे बदल घरबसल्या मोबाईलवरूनच करता येणार आहेत. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे थेट अ‍ॅपमध्ये अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

UIDAI च्या माहितीनुसार, या अ‍ॅपमुळे आधार कार्ड किंवा त्याची छायाप्रत कायमस्वरूपी सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही. नागरिक मोबाईलवरूनच आपली ओळख सिद्ध करू शकतील.

तसेच, गरज नसलेली वैयक्तिक माहिती लपवून (Masked Aadhaar) केवळ आवश्यक तपशीलच शेअर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे.

या अ‍ॅपमध्ये लॉगइन करण्यासाठी आधारशी नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करावा लागणार असून, ओटीपीद्वारे सुरक्षित लॉगइन प्रक्रिया असेल.

लॉगइन केल्यानंतर वापरकर्ते आपला आधार तपासू शकतील, डिजिटल स्वरूपात शेअर करू शकतील आणि विविध सेवांसाठी वापर करू शकतील. सध्या काही फीचर्स आंशिक स्वरूपात उपलब्ध होते, मात्र 28 जानेवारीपासून हे सर्व फीचर्स पूर्ण क्षमतेने सुरू होतील.

हे नवीन आधार अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. एकूणच, UIDAI चे हे पाऊल ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला बळ देणारे असून, नागरिकांसाठी आधारशी संबंधित कामे आता काही मिनिटांत, सुरक्षितपणे आणि घरबसल्या पूर्ण करणे शक्य होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe