Metro Line News : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन 8 प्रकल्पाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारी ही मेट्रो लाईन पुढील तीन वर्षांत पूर्ण करावी, तसेच प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या मिळवाव्यात, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मेट्रो लाईन 8 हा मुंबईतील दोन्ही विमानतळांना थेट जोडणारा पहिला प्रकल्प ठरणार आहे.

या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर असून त्यापैकी 9.25 किलोमीटरचा मार्ग भूमिगत तर 24.636 किलोमीटरचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असणार आहे. या मार्गावर एकूण 20 स्थानके असतील.
त्यामध्ये 6 भूमिगत आणि 14 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-2 ते घाटकोपर पूर्व दरम्यान भूमिगत स्थानके असतील, तर घाटकोपर पश्चिम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-2 पर्यंत उन्नत मार्ग असणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 30.7 हेक्टर भूसंपादन आवश्यक असून त्यासाठी अंदाजे 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 22 हजार 862 कोटी रुपये इतका असणार आहे. पुढील सहा महिन्यांत भूसंपादनासह सर्व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
यासोबतच राज्यातील इतर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाच्या कामाला गती देण्यात येणार असून या मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 954 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूळचेरा-हेदरी-सुरजागड या 85.76 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या सुधारित कामालाही मंजुरी मिळाली आहे.
हा चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्ग असणार असून यामुळे औद्योगिक व खनिज वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. एकूणच या निर्णयांमुळे राज्यातील दळणवळण आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













