Mumbai Mhada : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, हे स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीय मुंबईकर पाहत असतो. वाढती घरांची किंमत, महागडी भाडेव्यवस्था आणि मर्यादित उत्पन्न यामुळे हे स्वप्न अनेकांसाठी दूरच राहिलं आहे. मात्र आता मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आणि आचारसंहिता संपल्यानंतर आता म्हाडाकडून घरांच्या सोडत प्रक्रियेला वेग आला असून, मुंबई मंडळाकडून सुमारे ३,००० घरांची लॉटरी काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ मध्ये ही बहुप्रतीक्षित म्हाडा घरांची लॉटरी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. केवळ मुंबईच नव्हे तर कोकण मंडळाकडूनही ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरातील सुमारे ४,००० घरांची सोडत काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
त्यामुळे येत्या उन्हाळ्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात एकूण ७,००० परवडणारी घरे उपलब्ध होणार असल्याने घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई मंडळाच्या या लॉटरीमध्ये प्रामुख्याने बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्प, पत्राचाळ, मोतीलाल नगर यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमधील घरांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही वर्षांत म्हाडाने आपल्या धोरणात लक्षणीय बदल करत केवळ घरांची उभारणी न करता रस्ते, पाणीपुरवठा, वीज, गटार व्यवस्था अशा पायाभूत सुविधांवरही विशेष भर दिला आहे. त्यामुळे ही घरे केवळ परवडणारीच नव्हे तर सुविधा-संपन्न असणार आहेत.
म्हाडाच्या घरांचे दर बाजारभावाच्या तुलनेत जवळपास निम्मे असल्यामुळे दरवर्षी या लॉटरीसाठी अर्जांचा पाऊस पडतो. म्हाडाच्या ७६ वर्षांच्या प्रवासात आतापर्यंत सुमारे ९ लाख घरांची निर्मिती करण्यात आली असून, मार्च २०२६ मधील ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
आता या ३,००० घरांच्या लॉटरीकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले असून, अनेकांचे घराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची आशा पुन्हा एकदा बळावली आहे.













