Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाल्याने राज्यभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ई-केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ई-केवायसीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष फेर पडताळणी करण्यात येणार आहे.

वर्धा जिल्ह्यात ई-केवायसी प्रक्रियेमुळे तब्बल ३०,९१८ महिलांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ बंद झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २२,९२१ तर शहरी भागातील ७,९९७ महिलांचा समावेश आहे.
शासन स्तरावरून संबंधित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून, या महिलांना ३१ जानेवारीपर्यंत अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, २७ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत लाभ बंद झालेल्या महिलांनी आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा.
यावेळी महिलांनी अर्ज, आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि स्वयंघोषणापत्र (Self Declaration) सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.
ई-केवायसी करताना अनेक लाभार्थ्यांनी चुकीची माहिती भरली किंवा प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण न केल्यामुळे मोठ्या संख्येने महिलांचा लाभ बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यानंतर लाभार्थ्यांच्या मागणीनुसार शासनाने फेर ई-केवायसीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पात्र महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान ज्या महिला शासनाने ठरवून दिलेल्या निकषांमध्ये बसतील, त्यांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे.
त्यामुळे लाभ बंद झालेल्या महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता तात्काळ अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार असून, लाडकी बहीण योजना पुन्हा प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.













