Success Story : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथील भारती पोहोरकर यांची यशोगाथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अवघ्या सात महिन्यांची असतानाच वडिलांनी आईसह तिला सोडून दिलं. आयुष्याच्या सुरुवातीलाच आलेला हा धक्का कुठल्याही मुलीला खचवणारा असतो. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता भारतीनं संघर्षालाच आपली ताकद बनवलं.
आईसोबत आजोळी आलेल्या भारतीला आजी शांताबाई किसनराव भोगे आणि आजोबा किसनराव नागोजी भोगे यांनी मायेची उब दिली. त्यांच्याकडे केवळ एक एकर शेती होती.

मर्यादित साधनं, आर्थिक अडचणी आणि गरिबी असूनही त्यांनी मुलगी आणि नातीचं संगोपन केलं. आज आजी-आजोबा हयात नसले तरी त्यांनी दिलेली शेती आणि संस्कार भारतीच्या आयुष्याचा मजबूत पाया ठरले.
भारतीनं अमरावती शहरात वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने काही काळ उपजीविकेसाठी तिला पेट्रोल पंपावर नोकरी करावी लागली. तरीही शेतीशी असलेलं नातं कधीच तुटलं नाही.
अपयशानंतर खचून न जाता भारतीनं शेतीकडे वळण्याचा ठाम निर्णय घेतला. सुरुवातीला एक एकर शेतीत भाजीपाला लागवड करून तिनं स्वतःवरचा विश्वास वाढवला. भाजीपाल्यातून मिळालेल्या उत्पन्नानंतर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तिनं संत्रा लागवडीचा धाडसी निर्णय घेतला.
अवघ्या तीन ते चार वर्षांत एक एकर शेतात १४० संत्र्याची झाडं उभी राहिली. सुरुवातीच्या काळात मिरची आणि कांदा आंतरपीक घेऊन खर्च भागवण्यात आला.
सेंद्रिय खत आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करून जमिनीची सुपीकता जपण्यात आली. योग्य नियोजन, वेळेवर फवारणी आणि मेहनतीमुळे यावर्षी मृग बहार धरलेल्या संत्रा बागेचं उत्पादन थेट सात लाख रुपयांना विकलं गेलं.
महिला शेतकरी म्हणून काम करताना अनेक अडचणी आल्या. मजूर वेळेवर न मिळाल्याने पाणी देणं, खत टाकणं, फवारणी अशी बहुतेक कामं भारतीनं स्वतः आईसोबत केली.
आज या यशामुळे ६८ वर्षांच्या आई सुमित्रा पोहोरकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. संघर्षातून उभ्या राहिलेल्या भारती पोहोरकर आज ग्रामीण भागातील महिलांसाठी आत्मविश्वासाचं प्रतीक ठरत आहेत.













