Career After 10th : दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे अकरावी सायन्ससाठी कोणता ग्रुप घ्यावा – पीसीएम, पीसीबी की पीसीएमबी? ही निवड केवळ पुढील दोन वर्षांच्या अभ्यासापुरती मर्यादित नसून, ती थेट विद्यार्थ्याच्या संपूर्ण करिअरची दिशा ठरवणारी असते. त्यामुळे हा निर्णय भावनेच्या भरात न घेता, स्वतःची आवड, क्षमता, अभ्यासाची तयारी आणि दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) हा ग्रुप प्रामुख्याने गणित, तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडविण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मानला जातो. या ग्रुपनंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.

सीईटी, जेईईसारख्या परीक्षांद्वारे बीई/बीटेकसाठी प्रवेश मिळवता येतो. कॉम्प्युटर सायन्स, आयटी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल अशा अनेक शाखा पीसीएममधून खुल्या होतात.
याशिवाय आर्किटेक्चर, बीसीए, बीसीएस, बीएस्सी (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स), डिफेन्स, रिसर्च तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठीही हा ग्रुप आवश्यक ठरतो.
पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी) हा ग्रुप जीवशास्त्रात रुची असणाऱ्या आणि वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. नीट परीक्षेद्वारे एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस, व्हेटर्नरी, फिजिओथेरपी यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो.
त्यासोबतच फार्मसी, नर्सिंग, पॅरामेडिकल, फॉरेन्सिक सायन्स, ॲग्रिकल्चर, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, प्राणीशास्त्र व वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्येही पीसीबी ग्रुपमधून करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.
पीसीएमबी हा ग्रुप मात्र अभ्यासाच्या दृष्टीने अधिक कठीण मानला जातो. मेडिकलमध्ये प्रवेश न मिळाल्यास इंजिनिअरिंगचा पर्याय खुला ठेवायचा असेल, आयसरसारख्या संशोधन संस्थांची तयारी करायची असेल, एनडीए किंवा यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचा प्लॅन-बी असेल, फार्मसी किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये जायचे असेल, किंवा अजूनही संभ्रम असेल, तर हा ग्रुप उपयुक्त ठरतो.
एकूणच, स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील ध्येय स्पष्ट करूनच सायन्समधील ग्रुपची निवड करणे विद्यार्थ्यांच्या यशासाठी निर्णायक ठरेल.













