Mumbai Metro : मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या वाहतुकीला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-8 प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली.
35 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, हा प्रकल्प मुंबई महानगराच्या विकासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो-8 हा संपूर्ण मार्ग 35 किमी लांबीचा असेल. यापैकी सुमारे 9 किमीचा भाग भूमिगत तर उर्वरित मार्ग एलिव्हेटेड स्वरूपात असेल.
या मार्गावर एकूण 25 स्थानकांची उभारणी करण्यात येणार असून, ती इतर किमान तीन मेट्रो मार्गांशी जोडली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 18 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प पीपीपी (Public-Private Partnership) मॉडेलवर राबवण्यात येणार आहे. यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार व्हायबिलिटी गॅप फंडिंगअंतर्गत प्रत्येकी 20 टक्के योगदान देणार असून, उर्वरित 60 टक्के खर्च खासगी कंपनी करणार आहे.
मंजुरी जाहीर करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “साधारणतः हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होऊ शकतो, मात्र आम्ही तो साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.”
मेट्रो-8 प्रकल्पामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) आणि नव्याने सुरू होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. सध्या रस्तेमार्गे या दोन्ही विमानतळांदरम्यान प्रवासासाठी ट्रॅफिकनुसार 70 ते 90 मिनिटे लागतात. मात्र मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास लक्षणीयरीत्या कमी वेळेत पूर्ण होणार आहे.
या मेट्रो मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-2, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स, तारघर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-2 यांसारखी महत्त्वाची स्थानके असणार आहेत.
2031 पर्यंत दररोज सुमारे 10.3 लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे, इतर मेट्रो लाईन्स, बस टर्मिनल्स आणि प्रमुख रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी झाल्यामुळे मुंबई–नवी मुंबईतील प्रवाशांसाठी मेट्रो-8 हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि वेळ वाचवणारे माध्यम ठरणार आहे.













