तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात ऐतिहासिक बदल, थेट शेतकऱ्यांना 9.90 लाखांपर्यंत अनुदान

Published on -

Farmer Scheme : केंद्र सरकारने तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया (National Food Oil Mission – Oilseeds) या योजनेत मोठा बदल करत आता वैयक्तिक शेतकऱ्यांनाही थेट अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याअंतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट, तेलघाणा केंद्र, लहान व मध्यम तेल प्रक्रिया प्लांट तसेच गोदाम व साठवण सुविधा उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ फक्त सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) किंवा खासगी कंपन्यांनाच मिळत होता.

मात्र आता धोरणात बदल करत केंद्र सरकारने थेट वैयक्तिक शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे तेलबिया पिकांचे उत्पादन घेणाऱ्या आणि प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यात तेलबिया प्रक्रिया युनिट, तेलघाणा केंद्र, गोदाम व साठवण सुविधा, काढणीपश्चात उपयोगी उपकरणे आणि लहान-मध्यम प्रक्रिया प्लांट यांचा समावेश आहे.

देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढवणे आणि खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी अर्जदार हा वैयक्तिक शेतकरी असणे आवश्यक आहे.

तसेच तो तेलबिया पिकांचे उत्पादन घेत असावा किंवा तेलबियांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा त्याचा उद्देश असावा. प्रकल्पासाठी स्वतःची जमीन किंवा वैध भाडेकरार असणे गरजेचे आहे. शासनाने ठरवलेले तांत्रिक व आर्थिक निकष पूर्ण करणेही बंधनकारक आहे.

अर्जासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक खाते तपशील, शेतकरी ओळख क्रमांक, प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल आणि स्थानिक प्राधिकरणाची मंजुरी अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावा. सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाची संधी मिळणार असून तेलबिया क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल टाकले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe