Namo Shetkari Yojana : राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा आठवा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. हप्ता कधी जमा होणार, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
माहिती मिळवण्यासाठी शेतकरी सातत्याने बँका, कृषी कार्यालये व सेवा केंद्रांच्या चकरा मारत असूनही ठोस उत्तर मिळत नसल्याची स्थिती आहे.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता महिनाभरापूर्वीच वितरित झाला आहे.

त्यामुळे आता राज्य सरकारच्या ‘नमो’ योजनेच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा आतापर्यंत पूर्ण झालेली नाही.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, ई-केवायसी, आधार-बँक खाते लिंकिंग आणि पात्रतेची पडताळणी सुरू असल्याने यंदा लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे.
आयकर भरणारे शेतकरी, सरकारी व निमसरकारी सेवेत असलेले लाभार्थी तसेच ई-केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ पात्र व गरजू शेतकऱ्यांनाच हप्ता मिळणार आहे.
अमरावती जिल्ह्यात या योजनेत २.८४ लाख लाभार्थी नोंदणीकृत आहेत. मात्र, आठवा हप्ता न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संख्येने बँका व कृषी कार्यालयांत चौकशीसाठी गर्दी करत आहेत. अनेकदा पोर्टल बंद असणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२ जिल्ह्यांत आचारसंहिता लागू आहे. मात्र, उर्वरित २० जिल्ह्यांत आचारसंहिता नसल्याने निधी वितरणास कायदेशीर अडथळा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हप्ता वर्ग करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
दरम्यान, कृषी विभागाने ई-केवायसी, आधार-बँक खाते लिंकिंग व जमिनीच्या नोंदीतील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांत दिले जातात. मात्र, आठव्या हप्त्याची तारीख अद्याप जाहीर न झाल्याने शेतकरी प्रतीक्षेतच आहेत.













