Gold Rate : राज्यात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सराफा बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात तब्बल २ टक्क्यांची वाढ झाली असून १० ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच १.६ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. गेल्या दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर आज अचानक झालेल्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता तर गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
goodreturns संकेतस्थळानुसार, आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १६,५१७ रुपये इतका नोंदवला गेला आहे. हा दर कालच्या तुलनेत ३२२ रुपयांनी अधिक आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,१४० रुपये असून यामध्ये २९५ रुपयांची वाढ झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,३८८ रुपये असून तो कालच्या तुलनेत २४२ रुपयांनी वाढला आहे. परिणामी, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,६५,१७० रुपये, २२ कॅरेटचा १,५१,४०० रुपये तर १८ कॅरेटचा दर १,२३,८८० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.
महानगरांमध्येही सोन्याचे दर उच्च पातळीवर आहेत. चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १६,७३४ रुपये, २२ कॅरेटचा १५,३३० रुपये तर १८ कॅरेटचा १२,७८५ रुपये इतका आहे.
दिल्लीत २४ कॅरेट सोनं १६,५३० रुपये प्रति ग्रॅम, २२ कॅरेट १५,१५५ रुपये आणि १८ कॅरेट १२,४०३ रुपये प्रति ग्रॅम या दराने विकले जात आहे. कोलकातामध्येही जवळपास समान दर असून २४ कॅरेट १६,५१७ रुपये, २२ कॅरेट १५,१४० रुपये आणि १८ कॅरेट १२,३८८ रुपये प्रति ग्रॅम इतका भाव आहे.
दरम्यान, चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम ३८० रुपये असून तो कालच्या तुलनेत १० रुपयांनी वाढला आहे. चांदीचा दर प्रति किलो ३८०,००० रुपये इतका असून यात तब्बल १० हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या हालचाली आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढणारा कल यामुळे सोन्याच्या दरात ही उसळी आली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, लग्नसराईच्या काळात वाढलेले दर सामान्य ग्राहकांसाठी मोठा आर्थिक ताण ठरत आहेत.













