Zodiac Signs : फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होत असून सूर्य, मंगळ आणि राहू यांच्या युतीमुळे अंगारक योग आणि ग्रहयोग तयार होत आहे. मंगळ कुंभ राशीत प्रवेश करत असून तिथे आधीच राहू उपस्थित आहे. त्यामुळे अंगारक योग निर्माण होईल. तसेच १३ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करून राहूशी युती करेल, ज्यामुळे ग्रहयोग तयार होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अशुभ मानले जातात. या योगांचा प्रभाव विशेषतः मेष, सिंह, वृश्चिक, कुंभ आणि मीन या पाच राशींवर अधिक राहणार असून, या राशींसाठी फेब्रुवारी महिना आव्हानात्मक ठरू शकतो, असे ज्योतिषाचार्य आनंद पाठक यांनी सांगितले आहे.

मेष राशी : मेष राशीवर सध्या साडेसातीचा प्रभाव आहे. त्यातच अकराव्या घरात अंगारक योग आणि ग्रहयोग तयार होत असल्याने खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिमेला धक्का बसू शकतो. मित्रांसोबत गैरसमज होण्याची शक्यता असून काही महत्त्वाच्या इच्छा अपूर्ण राहू शकतात.
सिंह राशी : सिंह राशीत केतू भ्रमण करत आहे. त्यावर सूर्य, मंगळ आणि राहूची दृष्टी असल्याने कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. भागीदारीतील व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता असून पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक राशी : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ अंगारक योग तयार करत असल्याने आर्थिक नुकसान संभवते. मालमत्तेशी संबंधित वाद सध्या पुढे ढकलणे हिताचे ठरेल. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी. आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
कुंभ राशी : कुंभ राशीतच अंगारक योग आणि ग्रहयोग तयार होत असल्याने निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. करिअरविषयी चुकीचे निर्णय होण्याची शक्यता असून लोकप्रियतेत घट जाणवू शकते. त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कुटुंब आणि करिअर यामधील समतोल राखणे कठीण जाईल.
मीन राशी : मीन राशीच्या बाराव्या घरात हे योग तयार होत असल्याने आरोग्य खर्च वाढण्याची शक्यता आहे. मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात प्रतिक्रिया देणे टाळावे. कायदेशीर प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
एकूणच, फेब्रुवारी महिन्यात या पाच राशींनी संयम, सावधपणा आणि योग्य निर्णय घेण्यावर भर द्यावा, असा सल्ला ज्योतिषतज्ज्ञांकडून दिला जात आहे.













