म्हाडाकडून संक्रमण शिबिरातील भाडेकरूंना दिलासा; मास्टर लिस्ट अर्जाची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढ

Published on -

Mhada Mumbai : संक्रमण शिबिरात वास्तव्यास असलेल्या मूळ भाडेकरू, रहिवासी तसेच त्यांच्या वारसांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. अशा पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी घर मिळावे, यासाठी राबवण्यात येणाऱ्या मास्टर लिस्टअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

त्यामुळे आजवर विविध कारणांमुळे कायमस्वरूपी घरापासून वंचित राहिलेल्या रहिवाशांना हक्काचे घर मिळवण्याची आणखी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये समाविष्ट असलेले आणि सध्या संक्रमण शिबिरात राहणारे मूळ भाडेकरू किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक उपकरप्राप्त इमारती कालांतराने पाडण्यात आल्या, मात्र विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे त्यांची पुनर्बांधणी होऊ शकली नाही.

काही ठिकाणी पुनर्बांधणी झाली असली, तरी उपलब्ध सदनिका अपुऱ्या पडल्याने सर्व पात्र भाडेकरूंना घरे मिळू शकलेली नाहीत. परिणामी, अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरातच वास्तव्यास आहेत.

अशा रहिवाशांची छाननी करून त्यांना कायमस्वरूपी घराचा हक्क मिळावा, या उद्देशाने म्हाडाने मास्टर लिस्टअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, 15 फेब्रुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. या मुदतीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नसल्याने पात्र रहिवाशांनी वेळेत अर्ज करणे अत्यावश्यक आहे.

अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळ https://masterlist.mhada.gov.in वरील Citizen Corner मध्ये जाऊन “Application for Master List” या पर्यायावर क्लिक करून अर्ज करावा. तसेच masterlist.mhada.gov.in या स्वतंत्र पोर्टलवरूनही थेट नोंदणी करता येणार आहे.

या प्रक्रियेद्वारे अर्जदारांची कागदपत्रांसह पात्रता तपासली जाणार असून, पात्र ठरलेल्या रहिवाशांना पुढील टप्प्यात सदनिका वाटप करून कायमस्वरूपी घराचा हक्क दिला जाणार आहे.

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, सोपी आणि पारदर्शक ठेवण्यात आली असल्याने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी ही शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची संधी मानली जात आहे. आवश्यक कागदपत्रांची तयारी करून वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe