ATM मधून मिळणार 10 आणि 20 रुपयांच्या नोटा; केंद्र सरकारचा ‘सुपर प्लॅन’ काय आहे?

Published on -

ATM News : भारतात दैनंदिन व्यवहारांमध्ये लहान मूल्याच्या नोटांची कमतरता ही मोठी समस्या बनली आहे. विशेषतः १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा सहज उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिक, किरकोळ व्यापारी आणि प्रवाशांना रोजच्या व्यवहारांत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि अभिनव निर्णय घेतला असून, लहान नोटांचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘हायब्रीड एटीएम’ सुरू करण्याची योजना आखली आहे.

या नव्या संकल्पनेनुसार, हायब्रीड एटीएम हे पारंपरिक एटीएम आणि कॉइन वेंडिंग मशीनचे मिश्र स्वरूप असणार आहे. या मशीनमधून केवळ मोठ्या मूल्याच्या नोटाच नव्हे, तर थेट १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटाही मिळणार आहेत.

तसेच, ५०० किंवा २०० रुपयांच्या नोटा दिल्यास त्या बदल्यात लहान नोटा आणि नाणी मिळण्याची सुविधाही या एटीएममध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे सुट्टे पैशांसाठी बँकांच्या काउंटरवर किंवा दुकानांमध्ये वणवण फिरण्याची गरज राहणार नाही.

सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जात असून, मुंबईत काही ठिकाणी लहान नोटा देणाऱ्या नवीन मशीनची चाचणी सुरू आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, ही चाचणी यशस्वी ठरल्यास देशभरातील गर्दीच्या ठिकाणी-जसे की बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, रुग्णालये आणि सरकारी कार्यालये – येथे हे हायब्रीड एटीएम बसवण्यात येणार आहेत.

लहान नोटांच्या तुटवड्यामुळे सर्वाधिक फटका किरकोळ विक्रेत्यांना बसत आहे. ५०० रुपयांच्या नोटांचे सुट्टे नसल्याने अनेकदा ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. नव्या व्यवस्थेमुळे हे वाद कमी होतील आणि व्यवहार अधिक सुरळीत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, सध्या चलनात असलेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा संख्येने ४१.२ टक्के तर मूल्याने तब्बल ८६ टक्के वाटा आहे. याउलट, लहान नोटा संख्येने जास्त असल्या तरी त्यांचे एकूण मूल्य कमी आहे.

तज्ज्ञांच्या मते, हायब्रीड एटीएमसोबतच लहान नोटांची छपाई, वितरण आणि पुनर्चक्रणाची प्रक्रिया अधिक सक्षम केल्यास या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. सरकारचा हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe