Banking Job : सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील आघाडीची निर्यात-आयात वित्त संस्था असलेल्या इंडिया एक्झिम बँकेत (Export-Import Bank of India) डेप्युटी मॅनेजर (बँकिंग ऑपरेशन्स) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती आयबीपीएस (IBPS) मार्फत राबवली जात असून, इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम करिअर संधी मानली जात आहे.
या भरती मोहिमेत एकूण २० पदे भरली जाणार आहेत. अर्जप्रक्रिया २६ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून, उमेदवारांना १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ ibpsreg.ibps.in येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या पदासाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार ही लेखी परीक्षा फेब्रुवारी २०२६ महिन्यात होण्याची शक्यता आहे. परीक्षेची सविस्तर माहिती, प्रवेशपत्र आणि निकालाबाबतचे अपडेट्स अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जातील.
वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, या भरतीसाठी २१ ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. आरक्षण नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
पगाराच्या दृष्टीने ही नोकरी अत्यंत आकर्षक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला ४८,४८० रुपये ते ८५,९२० रुपये इतका मासिक पगार मिळणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा यांसारखे इतर शासकीय भत्तेही देण्यात येणार आहेत.
पात्रतेच्या अटी पाहता, उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी. तसेच फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस किंवा फॉरेन ट्रेड या विषयांत MBA/PGDBA/PGDBM/MMS असे दोन वर्षांचे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असणे आवश्यक आहे.
चार्टर्ड अकाउंटंट (CA) उमेदवारदेखील या पदासाठी अर्ज करू शकतात. यासोबतच किमान एक वर्षाचा अनुभव कमर्शियल बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा स्टेट लेव्हल संस्थेत असणे बंधनकारक आहे.
एकूणच, प्रतिष्ठित सरकारी बँकेत चांगल्या पगाराची आणि स्थिर करिअरची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी इंडिया एक्झिम बँकेतील ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.











