गावात एखादे प्रमाणपत्र काढायचे असो, सरकारी योजनेची माहिती हवी असो किंवा पंचायत कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असोत — ही सगळी डोकेदुखी आता इतिहासजमा होणार आहे. डिजिटल इंडिया मोहिमेने शहरांपुरते मर्यादित न राहता थेट ग्रामीण भारतात मोठी झेप घेतली आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेला ‘पंचम’ नावाचा नवीन व्हॉट्सअॅप चॅटबॉट ग्रामपंचायत व्यवस्थेला पूर्णपणे डिजिटल स्वरूप देण्यासाठी सज्ज झाला आहे. यामुळे सामान्य ग्रामस्थांपासून पंचायत प्रतिनिधींपर्यंत प्रत्येकाला घरबसल्या आवश्यक माहिती आणि सेवा मिळू शकणार आहेत.

‘पंचम’ म्हणजे नेमकं काय?
केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ हा अधिकृत डिजिटल सहाय्यक सादर केला असून, तो ग्रामपंचायतींसाठी एक विश्वासार्ह टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून काम करणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून याची घोषणा करण्यात आली. पंचमचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील पंचायत व्यवस्थेला अधिक पारदर्शक, वेगवान आणि कार्यक्षम बनवणे.
मीडिया अहवालांनुसार, हा चॅटबॉट देशभरातील सुमारे ३० लाखांहून अधिक निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि पंचायत अधिकाऱ्यांना थेट केंद्र सरकारच्या प्रणालीशी जोडणार आहे. त्यामुळे धोरणे, योजना आणि प्रशासकीय माहितीची देवाणघेवाण काही सेकंदांत होईल.
व्हॉट्सअॅपवरच सेवा — वेगळं अॅप नाही, शिकायचं काहीच नाही
‘पंचम’ खास व्हॉट्सअॅपवर लाँच करण्यात आला आहे, कारण भारतात हा मेसेजिंग अॅप जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. त्यामुळे नवीन अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही, वेगळं प्रशिक्षण घ्यायचीही आवश्यकता नाही.
सोप्या चॅट इंटरफेसमधून वापरकर्ते प्रश्न विचारू शकतात, माहिती मिळवू शकतात आणि पंचायत सेवांबाबत मार्गदर्शन घेऊ शकतात. अगदी सामान्य चॅटप्रमाणे संवाद होत असल्यामुळे तंत्रज्ञानाची भीती वाटणाऱ्या ग्रामस्थांनाही याचा सहज वापर करता येईल.
कोणकोणत्या सेवांसाठी उपयोगी ठरेल पंचम?
सरकारने पंचम चॅटबॉटला ई-ग्राम स्वराज प्रणालीशी जोडले आहे. हा चॅटबॉट पंचायत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आधारित कार्य करतो. याच्या माध्यमातून खालील गोष्टी सहज उपलब्ध होतील:
ई-ग्राम स्वराज, LGD आणि GPDP संबंधित माहिती
पंचायती राज मंत्रालयाच्या प्रमुख योजना व उपक्रम
पंचायत सेवा, प्रमाणपत्र प्रक्रिया आणि प्रशासकीय मार्गदर्शक सूचना
सरकारी योजनांचे तपशील आणि पात्रतेची माहिती
सध्या हा चॅटबॉट एआयप्रमाणे स्वतःहून उत्तरे तयार करत नाही, तर सरकारकडून आधीच सत्यापित केलेला डेटा वापरून अचूक माहिती पुरवतो. हा डेटा नियमितपणे अपडेट केला जाणार असल्याने मिळणारी माहिती नेहमी ताजी राहील.
ग्रामस्थांसाठी काय बदल घडवणार?
‘पंचम’मुळे ग्रामपंचायतीतील कामकाजाला डिजिटल गती मिळेल. नागरिकांना लहानसहान माहितीसाठी कार्यालयात रांगेत उभं राहावं लागणार नाही. पारदर्शकता वाढेल, वेळ वाचेल आणि सरकारी योजनांचा लाभ अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.
थोडक्यात सांगायचं झालं, तर पंचम हा केवळ चॅटबॉट नसून ग्रामीण भारतासाठी उभारलेलं एक डिजिटल पूल आहे — जो सरकार आणि ग्रामस्थांना एका क्लिकवर जोडणार आहे.











