फेब्रुवारीचे रेशन धान्य दुकानदारांकडे दाखल; कार्डधारकांना कधीपासून मिळणार धान्य आणि कोणकोणते धान्य उपलब्ध?

Published on -

Ration Card : शहरातील शिधापत्रिकाधारकांसाठी दिलासादायक बातमी असून दि. ५ फेब्रुवारीपासून फेब्रुवारी महिन्याचे धान्य वितरण सुरू होणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (PDS) शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये आवश्यक धान्याचा साठा उपलब्ध झाला असून वितरणासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रशासनाने रेशनकार्डधारकांना वेळेत तांदूळ, गहू आणि साखर मिळावी यासाठी सविस्तर नियोजन केले आहे. मात्र, यंदा धान्य वाटप प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून ई-पॉस मशीनद्वारे माहिती अद्ययावत झाल्यानंतरच फेब्रुवारी महिन्याचे धान्य वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राहणार असून गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सध्या ई-पॉस मशीन अपडेट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांकडे तांदूळ, गहू आणि साखरेचा साठा आधीच पोहोचवण्यात आला आहे.

मशीन अपडेटची प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थ्यांना धान्याचे वितरण सुरू करण्यात येईल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी ५ फेब्रुवारीनंतर आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यापासून धान्य वाटपात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून ज्वारीचे वाटप बंद करण्यात आले आहे. यापूर्वी सर्वसाधारण रेशनकार्डधारकांना ज्वारी, गहू आणि तांदूळ दिला जात होता.

मात्र, आता केवळ गहू, तांदूळ आणि साखरच दिली जाणार आहे. या बदलामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात धान्य वितरणास विलंब झाला होता. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

ही बाब लक्षात घेता, यावेळी धान्य वाटप सुरळीत पार पाडण्यासाठी पुरवठा विभागाकडून सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार असल्यास संबंधित पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, अशा सूचनाही शिधापत्रिकाधारकांना देण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe