Vande Bharat Sleeper Train : देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस हावडा ते कामाख्या या मार्गावर नियमितपणे धावू लागली असून, पहिल्याच फेरीपासून या ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तिकीट बुकिंग पूर्ण क्षमतेने भरले असून, सर्व फेऱ्यांना १०० टक्के प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रिमियम स्लीपर सेवेमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात वेग, आराम आणि आधुनिक सुविधा यांचा अनोखा संगम प्रवाशांना अनुभवता येत आहे.
भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार पुढील सहा महिन्यांत आणखी ८ स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून, वर्षभरात एकूण १२ ट्रेन कार्यान्वित केल्या जाणार आहेत. याशिवाय, देशभरात २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅपही तयार करण्यात आला आहे.

त्यामुळे भविष्यात लांब पल्ल्याच्या प्रवासाचा चेहरामोहराच बदलणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
या ट्रेनमधील खान-पान सुविधांमध्ये मोठ्या सुधारणा करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने घेतला आहे. प्रवाशांच्या फिडबॅकच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवास अधिक सुखकर आणि समाधानकारक करण्यावर भर दिला जात आहे.
आतापर्यंत प्रवाशांना सकाळी चहा दिला जात होता. मात्र, अनेक प्रवाशांनी चहासोबत नाश्ता देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत रेल्वेने लवकरच सकाळच्या चहासोबत नाश्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, प्रवाशांच्या विनंतीनुसार सायंकाळी चहा देण्याची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आयआरसीटीसीला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
इतकेच नाही तर सायंकाळच्या चहासह नॉनव्हेज जेवणाचा पर्याय देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नॉनव्हेज मेन्यूमध्ये कोणते पदार्थ प्रवाशांना अधिक पसंत पडतील, याचा अभ्यास सुरू असून, लवकरच अंतिम मेन्यू जाहीर केला जाणार आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासूनच पूर्ण क्षमतेने धावत असून, प्रवाशांच्या सोयी-सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे. या सुधारित सेवांमुळे स्लीपर वंदे भारत ट्रेनचा प्रवास आणखी संस्मरणीय ठरणार आहे.













