Railway News : शिर्डीतील साईबाबा आणि राजस्थानमधील खाटुश्यामजी दर्शनासाठी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील भाविकांना दर्शनासाठी प्रवास करणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 04716 साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित करण्यात आली होती. मात्र आता या गाडीची सेवा 1 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 04715 बिकानेर–साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी 31 जानेवारी 2026 पर्यंत धावणार होती, परंतु आता ही गाडी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.
या विशेष रेल्वेला मार्गातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ,
फतेहपूर शेखावाटी, चूरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ या स्थानकांवर थांबा असणार आहे. विशेषतः खाटुश्यामजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रिंगस हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून या गाडीमुळे त्यांना मोठी सोय होणार आहे.
शिर्डी हे देशातील एक प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असून दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येतात. तसेच राजस्थानमधील खाटुश्यामजी हेही श्रद्धेचे मोठे केंद्र आहे.
या दोन्ही देवस्थानांना जोडणारी साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सध्या भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. गाडीला मिळणारा उत्तम प्रतिसाद आणि वाढती मागणी पाहता रेल्वे प्रशासनाने या सेवेची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या मुदतवाढीदरम्यान रेल्वेच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
त्यामुळे आधीच आरक्षण केलेल्या तसेच भविष्यातील प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना कोणताही संभ्रम राहणार नाही. ही गाडी नियमित वेळापत्रकानुसारच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.













