नाशिक परिक्रमा मार्गाला शासनाची मंजुरी; ३,९५४ कोटींच्या खर्चाला हिरवा कंदील, ५० टक्के भूसंपादनावरच कामाला सुरुवात

Published on -

Ring Road News : राज्याच्या पायाभूत सुविधा विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांतर्गत नाशिक शहर परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पाला अखेर शासनाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या वाट्याच्या ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून, भूसंपादन प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

विशेष बाब म्हणून, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ५० टक्के भूसंपादन पूर्ण होताच कार्यारंभ आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २७) मुंबईतील मंत्रालयात राज्य पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक परिक्रमा मार्ग प्रकल्पाच्या राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाला मंजुरी देण्यात आली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, भाविकांची वाढती गर्दी, वाहतूक व्यवस्थेचा ताण आणि शहरातील कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.

प्रस्तावित नाशिक रिंग रोडची एकूण लांबी ६६.१५ किलोमीटर इतकी आहे. यापैकी सुमारे १४ किलोमीटरचा भाग नाशिक शहर हद्दीतून जाणार असून, उर्वरित मार्ग ग्रामीण भागातून जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे ७ हजार ९०० कोटी रुपये असून, हा खर्च केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे उचलणार आहेत.

या प्रकल्पासाठी २५ गावांमधील सुमारे १ हजार ९६० गटांमधील जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली असून, शासनाच्या मंजुरीमुळे या कामाला वेग येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देत भूसंपादनास प्राधान्य देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

नाशिक परिक्रमा मार्ग पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. औद्योगिक, व्यापारी आणि नागरी विकासाला चालना मिळेल तसेच शहराचा विस्तार नियोजनबद्ध पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा प्रकल्प नाशिकसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News