समृद्धी महामार्गावर ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान महत्त्वाची कामे; ‘या’ कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद

Published on -

Samruddhi Highway : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ठराविक वेळेत काही टप्प्यांमध्ये महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हे काम १४ टप्प्यांत राबविले जाणार असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका तसेच वर्धा जिल्ह्यातील सेलू, आर्वी आणि वर्धा तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कि.मी. शून्य ते कि.मी. ८९+४१३ या पट्ट्यात या गॅन्ट्री उभारल्या जाणार आहेत.

महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा भाग म्हणून या अत्याधुनिक गॅन्ट्री बसविण्यात येत आहेत. या प्रणालीमुळे वाहतूक नियंत्रण, अपघात व्यवस्थापन, वेग नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे अधिक सोपे होणार आहे.

एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गॅन्ट्री उभारणीचे काम अत्यंत तांत्रिक स्वरूपाचे असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक टप्प्यात संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

काम पूर्ण होताच त्या टप्प्यातील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. या प्रक्रियेदरम्यान वाहनचालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या कालावधीत समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासापूर्वी वाहतूकविषयक सूचना आणि अपडेट्सची माहिती घ्यावी, पर्यायी मार्गांचा विचार करावा तसेच वेळेचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवांशी संबंधित रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अन्य सेवा वाहनांसाठी आवश्यक ते समन्वय आणि सवलत देण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीने नमूद केले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास काम सुरक्षितपणे आणि नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe