Gold Rate : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अवघ्या दोन दिवस आधी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव आला असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. आज देशभरात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
Goodreturns च्या आकडेवारीनुसार, आज दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 8,230 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,70,770 रुपये इतका झाला आहे.

तर 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 7,600 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 1,56,550 रुपयांवर आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील घसरण गेल्या अनेक दिवसांत पहिल्यांदाच दिसून येत आहे.
दरम्यान, वायदे बाजारातही (MCX) सोन्या-चांदीच्या दरात मोठी पडझड झाली आहे. MCX वर सोन्याचा भाव आज सकाळी सुमारे 5,518 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,78,444 रुपयांवर व्यवहार करत आहे.
त्याचबरोबर चांदीच्या दरात आणखी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. MCX वर चांदीचा भाव तब्बल 17,000 रुपयांनी म्हणजेच 4.30 टक्क्यांनी घसरून प्रति किलो 3,82,684 रुपयांवर आला आहे.
काल रात्रीपासूनच चांदीच्या तेजीला ब्रेक लागला असून काल सकाळी प्रति किलो 4,10,000 रुपयांच्या उच्चांकावर असलेली चांदी आज सुमारे 15,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
आज दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो 3,95,000 रुपये इतका आहे. मुंबई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्येही चांदीचा भाव जवळपास समान आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि जळगाव या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति तोळा 1,70,620 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर 1,56,400 रुपये इतका आहे. तर राज्यभरात चांदीचा भाव प्रति किलो 3,95,000 रुपये आहे.
अर्थसंकल्पात आयात शुल्क किंवा करांबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली ही घसरण दागिने खरेदी करणाऱ्यांसह गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाची संधी मानली जात आहे.













