लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ; यवतमाळातील ५८ हजार महिलांचा हप्ता अडचणीत, गृह चौकशीचे आदेश

Published on -

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत सध्या मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

मात्र यवतमाळ जिल्ह्यात केवायसी पूर्ण करूनही तब्बल ५८ हजार महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत अर्ज करताना काही महिलांनी नियम आणि अटींचे पालन न करता अर्ज सादर केले होते. सुरुवातीला प्राथमिक तपासणीत या महिलांना हप्ता देण्यात आला.

मात्र नंतर शासनाकडून अर्जांची सखोल छाननी करण्यात आली. या छाननीदरम्यान काही घरांतील महिलांची नावे योजनेच्या निकषात बसत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा महिलांना पुढील हप्त्यांपासून वगळण्यात आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला व बालकल्याण विभागाने आता गृह चौकशीचे आदेश दिले आहेत. अंगणवाडी सेविकांना थेट संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केवायसी पूर्ण असूनही ज्यांना हप्ता मिळालेला नाही, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची, कुटुंबातील उत्पन्नाची आणि इतर निकषांची तपासणी केली जाणार आहे. ही चौकशी पूर्ण करून पुढील चार दिवसांत अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या अहवालाच्या आधारे संबंधित ५८ हजार महिला पात्र की अपात्र, याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सरकारच्या अहवालानुसार, नियम मोडून लाभ घेतलेल्या महिलांना गृह चौकशीनंतर अपात्र ठरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. तरीसुद्धा, कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही किंवा हप्ता कायमस्वरूपी थांबवला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. नियमांत बसणाऱ्या पात्र महिलांना हप्ता मिळत राहील, असा दिलासा सरकारकडून देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News