Railway Ticket Rule : भारतीय रेल्वेने तत्काळ (तत्काल) तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले असून, यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘तिकीट विंडो उघडताच काही सेकंदांतच तिकीट संपते’ अशी तक्रार प्रवाशांकडून सातत्याने होत होती.
एजंट, बॉट्स आणि ऑटो-फिल सॉफ्टवेअरमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत रेल्वे प्रशासनाने ही नवी पावले उचलली आहेत.

रेल्वेच्या नव्या नियमानुसार आता फक्त व्हेरिफाइड IRCTC खात्यांमधूनच तत्काल तिकीट बुक करता येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रवाशाला आपले IRCTC खाते आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अपूर्ण माहिती असलेली किंवा आधारशी लिंक नसलेली खाती तत्काल बुकिंगच्या वेळी आपोआप ब्लॉक केली जाणार आहेत. त्यामुळे बनावट किंवा फेक अकाउंट वापरून होणाऱ्या बुकिंगला आळा बसणार आहे.
तिकीट बुक करताना प्रवाशाने दिलेली माहिती आधार कार्ड किंवा अधिकृत सरकारी ओळखपत्राशी जुळणे आवश्यक असेल. नाव, जन्मतारीख आणि इतर तपशील चुकीचे आढळल्यास तिकीट रद्द होऊ शकते. यामुळे बनावट नावाने तिकीट काढून ते जास्त दराने विकण्याचे गैरप्रकार थांबवण्यास मदत होणार आहे.
तांत्रिक पातळीवर मोठे बदल
रेल्वेने ऑटो-फिल सॉफ्टवेअर, स्क्रिप्ट्स आणि बॉट्स ओळखण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक फिल्टर्स बसवले आहेत. त्यामुळे काही सेकंदांत संपूर्ण कोटा संपवणारी सॉफ्टवेअर प्रणाली आता निष्प्रभ ठरणार आहे.
तसेच, प्रवाशांची मोठी तक्रार असलेल्या पेमेंट फेल होण्याच्या समस्येवरही उपाय करण्यात आला आहे. नवे पेमेंट गेटवे अधिक वेगवान आणि सुरक्षित असल्याने तिकीट रद्द होण्याचा धोका कमी होणार आहे.
एजंटवर कडक कारवाई
तत्काल विंडो सुरू होताच एजंटकडून होणाऱ्या बुकिंगवर कडक नजर ठेवली जाणार आहे. यासाठी नवीन ट्रॅकिंग सिस्टीम आणि निर्बंध लागू करण्यात आले असून, सर्वसामान्य प्रवाशांना प्राधान्य देण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रवाशांसाठी सूचना
रेल्वेने प्रवाशांना सल्ला दिला आहे की, बुकिंगपूर्वी IRCTC प्रोफाइल अपडेट करून आधार लिंक करून घ्यावी. तसेच लॉग-इन तपशील, इंटरनेट कनेक्शन आणि पेमेंट पर्याय आधीच तपासून ठेवावेत. या बदलांमुळे आता सामान्य प्रवाशांना कन्फर्म तत्काल तिकीट मिळण्याची शक्यता पूर्वीपेक्षा अधिक वाढणार आहे.













