Vande Bharat Sleeper Train : देशातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस आता स्लीपर अवतारात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. गुवाहाटी ते हावडा दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्याच वंदे भारत स्लीपर ट्रेनला प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनचे तिकीट पहिल्याच दिवशी अवघ्या काही मिनिटांत फुल झाल्याने भारतीय रेल्वेने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये कोच वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १६ कोच असलेल्या या ट्रेनमध्ये लवकरच आणखी ८ कोच जोडले जाणार असून एकूण कोचसंख्या २४ इतकी होणार आहे. वंदे भारत ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदाच २४ कोच असलेली ट्रेन धावणार असल्याने हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरूनच प्रवाशांचा प्रतिसाद किती मोठा आहे, हे स्पष्ट होते. कोचसंख्या वाढल्यामुळे अधिक प्रवाशांना या सेमी हायस्पीड ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळणार असून, वेटिंग लिस्टची समस्या देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या १६ कोच असलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण ८२३ बर्थ उपलब्ध आहेत. मात्र, २४ कोच झाल्यानंतर ही क्षमता थेट १,२२४ बर्थपर्यंत वाढणार आहे. म्हणजेच सुमारे ४०० हून अधिक अतिरिक्त प्रवासी एका प्रवासात या ट्रेनने प्रवास करू शकणार आहेत. ही बाब प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
रेल्वेच्या माहितीनुसार, ही २४ कोच असलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार करण्यात येणार आहे. या ट्रेनचे डिझाइनही खास असणार असून भारतीय रेल्वे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या वंदे भारत ट्रेनचे डिझाइन करणार आहे.
या ट्रेनमध्ये १७ एसी-३ टियर कोच, ५ एसी-२ टियर कोच, १ एसी फर्स्ट क्लास कोच आणि १ एसी पॅन्ट्री कार असणार आहे. आधुनिक सुविधा, आरामदायी बर्थ, जलद प्रवास आणि उच्च दर्जाची सेवा यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांसाठी नवा प्रवासाचा अनुभव देणार आहे. भारतीय रेल्वेचा हा निर्णय भविष्यातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.













