Airplane Rules : विमान प्रवास करताना प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये मोबाईल फोन एअरप्लेन (फ्लाईट) मोडवर ठेवण्याचा अलर्ट हमखास दिला जातो. अनेक प्रवाशांना हा नियम केवळ औपचारिक वाटतो. मात्र, या सूचनेमागे विमानाच्या सुरक्षिततेशी संबंधित अत्यंत महत्त्वाचं कारण दडलेलं आहे.
विमानात बसल्यानंतर केबिन क्रू सीट बेल्ट, आपत्कालीन दरवाजे, ऑक्सिजन मास्क आणि इतर सुरक्षा नियमांची माहिती देतात. याच वेळी मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवण्याचं आवाहन केलं जातं. फ्लाईट मोड ऑन केल्यावर मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद होतं, तर वाय-फाय आणि ब्लूटूथ मर्यादित स्वरूपात वापरता येतात.

एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते, एका मोबाईल फोनचा सिग्नल विमानासाठी मोठा धोका ठरत नाही. मात्र, विमानात एकाच वेळी शेकडो प्रवाशांचे मोबाईल फोन नेटवर्क शोधू लागले, तर त्याचा एकत्रित परिणाम एअरक्राफ्टच्या कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन सिस्टीमवर होऊ शकतो. विशेषतः टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी हा धोका अधिक वाढतो.
मोबाईल फोन सतत जवळच्या नेटवर्क टॉवरशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतो. विमान आकाशात वेगाने हालचाल करत असल्यामुळे फोन अनेक टॉवरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. यामुळे रेडिओ सिग्नलमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. या सिग्नल्समुळे पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यांच्यातील संवादावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात.
टेक-ऑफ आणि लँडिंग हे विमान प्रवासातील सर्वात संवेदनशील आणि धोकादायक टप्पे मानले जातात. या काळात पायलटला अचूक माहिती, स्पष्ट सिग्नल आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा नसलेलं कम्युनिकेशन आवश्यक असतं. अगदी लहानसा सिग्नल हस्तक्षेपही गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतो.
आजच्या आधुनिक विमानांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टीम वापरली जाते. त्यामुळे मोबाईल सिग्नलचा थेट धोका कमी झाला असला, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्त्वानुसार फ्लाईट मोड अनिवार्य करण्यात आला आहे.
म्हणूनच, विमान कर्मचारी देत असलेल्या सूचनांचं पालन करणं केवळ नियम म्हणून नव्हे, तर स्वतःच्या आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. पुढच्यावेळी विमानात बसताना मोबाईल फ्लाईट मोडवर टाकण्यामागचं हे महत्त्वाचं कारण नक्की लक्षात ठेवा.













